शिवसेनेला शाकाहार मान्य: शाकाहार- पूरक शहराचा पुरस्कार स्वीकारला महापौरांनी

66

मुंबईत काही वर्षांपासून शाकाहार- मांसाहार यांच्यातील वाद रंगलेला असतानाच मांसाहाराचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘पिटा इंडिया’ संस्थेने २०२१ या वर्षाचा सर्वाधिक शाकाहार-पूरक शहर पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारून महापौरांनी मुंबई शहर हे शाकाहारांचे असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे शिवसेना नक्की शाकाहारी की मांसाहारी असा प्रश्न निर्माण झाला असून हा पुरस्कार स्वीकारून महापौरांनी शिवसेनेसमोर मोठ्या अडचणी निर्माण केल्या आहेत.

महापौर निवासस्थानी कार्यक्रम पार पडला

शाकाहारपूरक आस्थापनांची भरभराट आणि मानव व इतर प्राण्यांसाठी एक उत्तम विश्व निर्माण व्हावे यासाठी पूरक वातावरण निर्मिती केल्याबद्दल ‘पिटा इंडिया’ संस्थेने २०२१ या वर्षाचा सर्वाधिक शाकाहार-पूरक शहर पुरस्कारासाठी मुंबई शहराची निवड केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा पुरस्कार मुंबईकरांच्या वतीने स्वीकारला. मांसाहाराचा तिटकारा करणारे अनेक बिल्डर, सोसायट्या मांसाहार करणाऱ्या कुटुंबाला आपल्या इमारतीमध्ये घरे विकत घेऊ देत नाहीत. तसेच भाड्याने घरे देण्यास विरोध करतात. यावरून अनेकदा राजकीय आंदोलने झाली आहेत. मुंबई महापालिका सभागृहातही मांसाहारी कुटुंबाला सदनिका नाकारणाऱ्या बिल्डरांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला होता. हे वाद सुरू असतानाच शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्या पिटा इंडिया संस्थेकडून शुक्रवारी हा पुरस्कार स्वीकारल्याने पुन्हा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. भायखळा येथील महापौर निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, राणीबागचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी व पिटा इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

काय आहे पुरस्काराचा उद्देश?

मुंबईत शाकाहारींसाठी खाण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात शाकाहारी खाद्यपदार्थ पुरवठा करणारी हाॅटेल आहेत. मुंबईत भारतातील चौथ्या क्रमांकाची मांस-मुक्त लोकसंख्या राहते. त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या काॅफी, पिझ्झा, बर्गरसह, वडापाव, मिसळपाव, शेव पुरी, कोथिंबीर वडी, रगडा पॅटिस यांसारखे स्वादिष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. प्राण्यांना क्रूर वागणूक न देणाऱ्या फॅशन आणि सौंदर्य प्रसाधनांचे ब्रँड्स उपलब्ध आहेत. मांस-मुक्त बर्गरपासून क्रूरता-मुक्त मेकअप पर्यंत, मुंबई प्राण्यांचे शोषण न करता जगणे सुलभ करत आहे, या करिता हा पुरस्कार देण्यात आला आहे, असे पेटा इंडियाच्या व्हेगन फूड्स अँड न्यूट्रिशन स्पेशालिस्ट डॉ. किरण आहुजा यांनी याबाबत बोलतांना स्पष्ट केले.

पुरस्कार परत करावा – मनसे

पिटा इंडियाच्या २०२१ या वर्षातील पुरस्कारासाठी मुंबई शहराची निवड केल्याबद्दल या संस्थेचे आभार मानत महापौरांनी, आपण विचाराने, आहाराने, विहाराने शाकाहारी असले पाहिजे, असे सांगितले. पण हा पुरस्कार स्वीकारल्याने मनसे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई ही आगरी, कोळी समाजाची आहे. मुंबईने कधीच एका आहार पद्धतीचे समर्थन केलेले नाही तसेच करणार नाही. महापौरांनी असे पुरस्कार स्वीकारणे योग्य नाही. मिळालेला पुरस्कार परत करावा, असे मत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले.

सपा, काँग्रेसचाही विरोध

समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौरांनी असा पुरस्कार स्वीकारणे चुकीचे असल्याचे सांगत महापौर जर शाकाहाराचा पुरस्कार करणार असतील, तर कोळी बांधवांनी मासेविक्री बंद करावी का?, असा सवाल केला आहे. त्यामुळे महापौरांनी हा पुरस्कार परत करावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी, ‘जगा आणि जगू द्या’ असे हे तत्व आहे. आपण त्यात ढवळाढवळ केली तर सृष्टीचा समतोल बिघडून जाईल, असे सांगत शाकाहारी- मांसाहारी असा भेद करणे किंवा विशिष्ट आहारच चांगलाा, असा दावा करणे चुकीचे असल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.