यशवंत जाधव भीमपुत्र! अशा धमक्यांना घाबरणार नाहीत, महापौरांचे भाजपवर टीकास्त्र

227

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाच्या केंद्रीय पथकाने यशवंत जाधवांच्या घरी शुक्रवारी सकाळीच धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी होत आहे. या तपास पथकासह यशवंत जाधव यांच्या घरी सीपीआरएफचे जवान देखील दाखल झाले आहे. दरम्यान याठिकाणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधव यांचे निवासस्थान असलेल्या परिसराला भेट दिली. शिवसेनेचे यशवंत जाधव हे भीमपुत्र असून ते कोणत्याही कारवाईला घाबरणार नाहीत असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : मोठी बातमी! तपास यंत्रणेच्या रडारवर आता शिवसेनेचा ‘हा’ नेता )

आम्ही घाबरणार नाही 

आयटीची धाड ही पहिल्यांदाच कोणावर पडतेय अशातला भाग नाही. सगळी प्राधिकरण ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी प्राधिकरण आहेत त्यामुळे त्यांना सहकार्य करणे, त्यांना लागणारी कागदपत्रे व माहिती यशवंत जाधव नक्की देतील. आम्ही संविधान मानणारी लोकं, अशा धमक्यांना घाबरणार नाही, व्हायचं ते होऊ दे असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे.  यशवंत जाधव हे भीमपुत्र असून ते कोणाला घाबरणारे नाहीत. मी सकाळी भराडी देवीच्या जत्रेवरून आले कुठेही लपून बसले नव्हते. सर्व शिवसैनिकांनी शांत रहावे हे सांगण्यासाठी मी इथे आले आहे. जिथे भाजप सत्ता नाही त्याठिकाणी सर्वांना अशा यंत्रणांचा त्रास होत आहे. झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाबमध्येही असा त्रास होत आहे. त्रास होतोय म्हणून आम्ही आता घरात बसणार नाही. असे त्यांनी सांगितले.

महापौरांनी दिले आव्हान

कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यास यशवंत जाधव सक्षम आहेत. मुंबई पालिकेला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असून भाजप नेत्यांनी मागील 20 वर्षातील महापालिकेतील प्रकरणे उकरून काढण्याची धमकी दिली आहे, ही प्रकरणे त्यांनी बाहेर काढावीच असे आव्हानच महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांना दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.