संजय राऊतांच्या विरोधात मेधा सोमैयांचा मानहानीचा खटला दाखल

150

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दहशत आणि भीती निर्माण करण्यासाठी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याकरता राऊत आपल्यावर १०० कोटी शौचालय घोटाळा केल्याचा खोटा आरोप करीत आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रा.डॉ. मेधा किरीट सोमैया यांनी शिवडी न्यायालयात केली.

१०० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप 

भारतीय दंड संहिता कलम ४९९ व ५०० च्या अंतर्गत संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट २५ नं. न्यायालय येथे प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी केली आहे. गेले  अनेक आठवडे संजय राऊत यांनी प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला आहे, १०० कोटी रुपयांचा अपहार केला आहे, असे सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर सांगत आहेत. प्रा. डॉ. मेधा सोमैया व युवक प्रतिष्ठान यांनी मिळून अशा प्रकारची फसवणूक केली असून त्यांची लवकर अटक होणार अशा प्रकाराचे ही विधान अनेक वेळा करण्यात आले. प्रा. डॉ. मेधा सोमैया यांच्या विरोधात पोलीस दखल घेत असून आर्थिक गुन्हे विभागाद्वारा एफआयआर होत आहे. त्याच बरोबर मँग्रोव्ह विभाग पर्यावरण खात्यातर्फे ही चौकशी चालू असून कारवाई करण्यात येत आहे, असेही भाष्य राऊत यांनी केले.

(हेही वाचा ज्ञानवापी मशीद तेव्हाच जमीनदोस्त झाली असती, पण… )

किरीट सोमैया यांचाही दावा दाखल 

डॉ. मेधा सोमैया, युवक प्रतिष्ठान यांनी कोणताही घोटाळा केला नसून १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रतिपादन या याचिकेत करण्यात आले आहे. भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमैया यांना बदनाम करून भीतीचे वातावरण सोमैया परिवारामध्ये उभे करणे हाच संजय राऊत व शिवसेनेचा हेतू असल्याची तक्रार आहे. अशाच पद्धतीने संजय राऊत यांनी २०१६ मध्ये प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी ११८ कोटींचा एसआरए (SRA) घोटाळा केला असल्याची बोंबाबोंब व अपप्रचार केला होता. प्रा. डॉ. मेधा सोमैया समवेत डॉ. किरीट सोमैया यांनी शिवडी न्यायालयात हा खटला दाखल केला असून पुढच्या आठवड्यापासून याची सुनावणी सुरु होईल असा विश्वास ही व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.