मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष अजूनही निवळलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय न्यायप्रविष्ट असताना यावर 8 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. पण निर्माण झालेल्या या घटनात्मक पेचामुळे आता शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे.
निकम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या घटनात्मक पेचामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे क्लिष्ट अशा या घटनात्मक पेचाबाबत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत सर्वोच्च न्यायालयातील खटल्याबाबत चर्चा झाल्याचे समजत आहे.
(हेही वाचाः ग्रामपंचायत निवडणुकीत पवारांना शिंदेंचा मोठा धक्का)
घटनात्मक पेचावर खल
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाचा हा तिढा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि निकम यांच्यात झालेल्या भेटीत सुनावणीची कायदेशीर बाजू समजून घेणे, त्याचं घटनात्मक विश्लेषण करणे यावर खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community