मुख्यमंत्री आणि अमित शहांमध्ये रात्री उशिरा खलबतं, कोणत्या विषयांवर झाली चर्चा?

89

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. सध्या मुख्यमंत्री हे दिल्लीत असून त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष,सर्वोच्च न्यायालयात अधिकृत शिवसेनेच्या दर्जाबाबत चाललेली लढाई आणि आगामी दसरा मेळावा याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे.

शिंदे-शहा भेट

विविध 13 राज्यांतील शिवसेनेचे राज्य प्रमुख हे बुधवारी शिंदे गटात सहभागी झाले. त्यानिमित्त बुधवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात येण्यासाठी रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यांनी आपला मुक्काम वाढवला. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री गुरुवारी देखील दिल्लीत असल्याचे सांगण्यात येत होते.

पण गुरुवारी दिवसभरात त्यांची एकाही केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांची भेट होऊ शकली नाही. गुरुवारी रात्री केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेत राज्यातील विकासकामांबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

(हेही वाचाः सरवणकर आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा हाणामारी होता होता राहिली, काय झाले नेमके)

गुरुवारी राज्यातील विविध कामांसाठी मुख्यमंत्री शिंदे हे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण काही कारणांमुळे या भेटी होऊ शकल्या नसून मुख्यमंत्र्यांनी फओनवरुन सर्वांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.