तब्बल २१ महिन्यांनी होणार गटनेत्यांची सभा

85

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबई महापालिका सभा आणि वैधानिक तसेच विशेष सभांचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे ऑनलाईन सुरु करण्यात आले. मात्र, त्यानंतर या सर्व समित्यांच्या सभांचे कामकाज आज प्रत्यक्ष सुरु झाले असले, तरी महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गटनेत्यांच्या सभेचे आयोजन कोरोनाचा आजार नियंत्रणात आल्यानंतरही होऊ शकला नाही. त्यामुळे तब्बल २१ महिन्यांनी महापालिकेच्या गटनेत्यांची सभा प्रत्यक्ष होणार आहे.

या कारणांमुळे सभा झाल्या नाहीत

महापालिकेच्या धोरणात्मक बाबी तसेच योजनांबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेत चर्चा केल्या जातात. गटनेत्यांच्या सभेमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयानुसार प्रशासन संबंधित समित्यांपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवत असतात. परंतु कोविडच्या आजारानंतर बंद झालेल्या गटनेत्यांच्या सभेची प्रथा आजपर्यंत सुरु झालेली नाही. कधी महापौरांना आयोजन करण्यास उत्सुकता, तर कधी सभा आयोजित केल्यांनतर महापालिका आयुक्तांना वेळ नाही या सर्व करणांमुळे आजवर गटनेत्यांच्या सभा होऊ शकल्या नाहीत. कोविडनंतर २३ जुलै २०२१ रोजी केवळ फिरोजशाह मेहता यांच्यासंदर्भातील एका विषयावर चर्चा करण्यासाठी गटनेत्यांची सभा झाली होती. परंतु या गटनेत्यांच्या सभेत याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती.

आयुक्तांची उपस्थिती असणार का?

त्यामुळे अखेर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनावर घेत यापुढे अशा प्रकारच्या सभा रद्द होऊ नये यासाठी गटनेत्यांना विश्वासात घेत त्यांना पत्र पाठवली आहेत. यामध्ये गटनेत्यांची सभा रद्द होणार नाही याची आपण काळजी घेऊ असे म्हटले आहे. कोविडच्या भीतीमुळे आयुक्त इक्बालसिंह चहल हे प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहत नाही. त्यामुळे महापौरांनी सोमवारी ३ जानेवारीला बोलावलेल्या सभेला आयुक्त उपस्थित राहतात का की वाढत्या कोविडमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

( हेही वाचा :सेनेत आग लावण्याचं माझं काम नाही, दानवेंची शिवसेनेवर कुरघोडी)

आयुक्तांना कशाची भीती

आजवर महापालिका आयुक्त गटनेत्यांच्या सभेला न आल्याने या सभा होऊ शकल्या नाहीत. याबाबत काही प्रमाणात चिंता महापौरांनी गटनेत्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनीही याबाबत आयुक्तांच्या या कार्यपध्दतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. खुद्द विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी गटनेत्यांच्या सभा का होत नाही? आयुक्तांना कशाची भीती वाटते असा सवाल केला होता. तसेच आयुक्त परस्पर निर्णय घेत असल्यानेही नाराजी व्यक्त करतच अशाप्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी गटनेत्यांना विश्वासात घेतले जाणे आवश्यक असल्याचेही मत मांडले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.