वंदना बर्वे
कर्नाटकच्या विजयानंतर अंगात बारा हत्तींचे बळ संचारलेल्या काँग्रेसपुढे लहान-लहान पक्षांवर नमते घ्यायची वेळ आली आहे. येत्या १२ तारखेला पाटण्यात होणारी भाजपविरोधी पक्षांची बैठक केवळ काँग्रेसमुळे पुढे ढकलावी लागली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात बोलावलेली विरोधी पक्षांची बैठक आता २३ जून रोजी होणार आहे. आधी ही बैठक येत्या १२ तारखेला होणार होती. परंतु, काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे ही बैठक आता २३ जूनला होणार आहे. नितीश कुमार यांनी ठरविलेल्या कार्यक्रमानुसार आपण बैठकीला उपस्थित राहिलो तर नितीशकुमार यांचे महत्व वाढेल, असे काँग्रेसला वाटू लागले होते. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कधीही वाढू नये आणि त्यांनी आपल्या नेतृत्वाखालीच काम करीत रहावे, ही काँग्रेसची मानसिकता कुणापासूनही लपून नाही, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
कदाचित म्हणूनच काँग्रेसने बैठकीची तारीख आणि ठिकाण बदलण्याचा सल्ला दिला होता. ही बैठक पाटण्याऐवजी हिमाचल प्रदेशात घ्यावी असा काँग्रेसचा आग्रह होता. परंतु, नितीशकुमार यांनी तारीख बदलली असली तरी बैठक पाटण्यातच होणार आहे.
(हेही वाचा – महामंडळ वाटपासाठी भाजपा-शिवसेनेत ६०:४० चे सूत्र; समन्वयाची जबाबदारी दोन मंत्र्यांवर)
विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी पुढची तारीख २३ जून ठरविण्यात आली असली तरी काँग्रेसकडून अद्याप होकार मिळालेला नाही. परंतु, बैठकीसाठी पुरेसा वेळ मिळाल्यामुळे सर्व पक्ष उत्तम पद्धतीने विचार—विनिमय करू शकतील, असे जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विरोधकांच्या पहिल्या बैठकीनंतर तीन-चार दिवसांनी विचारसत्र बोलावून त्यात सर्वंकष विषयांवर चर्चा करावी, असा सल्ला सुध्दा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. या मुद्यावर विचारविनिमय सुरू आहे. महत्वाचा मुद्या असा की, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसच्या अंगात बारा हत्तींचे बळ संचारले आहे. यामुळे, एकप्रकारे क्षेत्रीय पक्षांवर वर्चस्व गाजविण्याची संधी काँग्रेसला मिळाली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community