मेट्रो- २,७ चाचणी शुभारंभ! प्रकल्पाचे जनक फडणवीसांना नाही निमंत्रण! 

ज्यांच्या कार्यकाळात मेट्रो - २ आणि ७ या प्रकल्पांची पायाभरणी झाली व बहुतांश काम पूर्ण झाले, ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रकल्पाच्या चाचणी शुभारंभ कार्यक्रमाच्या पत्रिकेवर टाकण्यात आले नाही.

94

पश्चिम उपनगरासाठी असलेल्या मेट्रो-२ आणि मेट्रो-७ या दोन्ही मेट्रो लाइनची चाचणी सोमवार, ३१ मे रोजी करण्यात आली.  चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. उप मुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची नावे होती.  परंतु,  ज्यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची पायाभरणी झाली व बहुतांश काम पूर्ण झाले, त्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पत्रिकेवर टाकण्यात आले नव्हते, त्यांना निमंत्रणही देण्यात आले नव्हते.  यावरून भाजपाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला,  तसेच भाजपाने निषेध आंदोलनही केले. 

(हेही वाचा : पवार-फडणवीस भेटीमागे दडलंय काय?)

काय म्हणालेत दरेकर?

देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले. रात्रीच्या 2 ते 3 दरम्यानदेखील देवेंद्र फडणवीसांनी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. महाविकास आघाडीने श्रेय घ्यावे, मात्र ज्यांनी प्रकल्पाचा पाया रचला किंबहुना प्रकल्प पूर्णत्वास नेला, त्यांना कार्यक्रमाला बोलावणे गरजेचे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी झाले नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून चुकीचा पायंडा महाविकास आघाडी सरकारकडून पाडला जात आहे. म्हणून दोन्ही कार्यक्रमांवर  आम्ही बहिष्कार घातला. माझे नाव पत्रिकेवर आहे. पण प्रकल्पाचे जनक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक टाळल्याबद्दल माझा उपस्थित राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.  उलट आम्ही सर्वांनीच सरकारचा निषेध केल्याचे दरेकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.