दहिसर चेकनाक्याजवळील मुंबईच्या प्रवेशद्वारावर ‘मुंबई मेट्रो’ने हातोडा चालवला आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रोच्या लाईन ७ वरील मार्गाच्या आड हे प्रवेशद्वार येत असल्याने एमएमआरडीएच्यावतीने तोडले जात आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील हे प्रवेशद्वार मेट्रोच्या कामांमुळे बाधित झाल्याने आता प्रत्यक्षात या प्रवेशद्वाराचीही उंचीही भविष्यात कमी होणार आहे.
२०१०मध्ये प्रवेशद्वार उभारलेले
दहिसर पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर २०१०मध्ये महापालिकेच्यावतीने प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, आठ वर्षांनंतरच या प्रवेशद्वाराच्या छताचा काही भाग निखळला गेला होता. त्यामुळे या प्रवेशद्वाराचे संरचनात्मक परिक्षण जोशी कन्सल्टंट यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या अहवालानुसार दुरुस्तीसोबत आवश्यक ती कामे तसेच विद्युत कामे अंतर्भूत करून २०१८मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर जानेवारी २०१९मध्ये एकूण यासाठी कंत्राटदाराची निवड करत यावर २ कोटी ७ हजार रुपये खर्च केले जाणार होते.
(हेही वाचा : कोरोनाच्या दोन लसी घेतल्या असतील तर काढा लोकलचा ई-पास…कसा ते वाचा…)
कमानीचा भाग सध्या तोडला जात आहे!
परंतु दोन वर्षांपूर्वीपासून मेट्रो रेल्वेचे काम सुरु असून या मार्गाच्या आड येणाऱ्या अनेक स्कायवॉक तसेच रस्ते पादचारी पूल बंद करण्यात आले आहे. परंतु दहिसर येथील मुंबईचे प्रवेशद्वारही या मेट्रोच्या कामांमध्ये बाधित होत असल्याने मागील काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांची मंजुरी घेत या प्रवेशद्वारावर एमएमआरडीएच्यावतीने हातोडा चालवला जात आहे. या प्रवेशद्वाराचा वरील कमानीचा भाग सध्या तोडला जात आहे.
प्रवेशद्वाराच्या ्दुरुस्तीचे काम एमएमआरडीए करील
सध्या या प्रवेशद्वाराच्या कमानीचा भाग एकूण ३०.५ मीटर उंचीचा असून मेट्रो रेल्वेमुळे ही कमानी तोडण्यात येत असल्याने भविष्यात या प्रवेशद्वाराची उंची कमी होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रवेशद्वाराचे बांधकाम धोकादायक झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु तत्पूर्वी एमएमआरडीएने मेट्रोच्या कामांमध्ये हे प्रवेशद्वार येत असल्याने त्यांची डागडुजी करू नये अशी विनंती केली. तसेच मेट्रोच्या कामासाठी ही कमान तोडण्यात येत असल्याने मेट्रो लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवेशद्वाराचेही काम एमएमआरडीए करून देईल, असे सांगितले आहे
Join Our WhatsApp Community