Metro : ठाणे जिल्ह्यात विस्तारणार मेट्रोचे जाळे

184

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन महत्त्वाच्या मेट्रो डेपोच्या बांधकामासाठी महत्त्वाच्या जमिनींचा ताबा मिळवून मेट्रो नेटवर्कच्या विस्तारात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नव्याने अतिरीक्त जमिनीमुळे मुंबईतील नागरिकांसाठी मेट्रो ट्रेनचे कार्यक्षम संचालन, देखभाल आणि दुरुस्ती सुलभ होणार आहे.

दोन महत्वपूर्ण मेट्रो मार्गिकांसाठीचे डेपो

मुंबई मेट्रो मार्ग- १२ च्या डेपोसाठी ठाणे जिल्ह्यातील निळजेपाडा येथील ४७ हेक्टर जमीन शासनाने एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे. मौजे निळजेपाडा, ता. कल्याण, जि. ठाणे येथील सदर जमीन विनामूल्य म्हणून एमएमआरडीएला देण्याचे आदेश जिल्हाधकाऱ्यांमार्फत निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ साठी मौजे डोंगरी येथील जागेचा आगाऊ ताबा देणेस मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ साठी देखील मौजे डोंगरी येथील ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी दिला आहे. या दोन्ही जागांमुळे ठाणे जिल्ह्यात दोन महत्वपूर्ण मेट्रो मार्गिकांसाठीचे डेपो आता उभारण्यात येणार आहेत जिथे मेट्रो गाड्या विसावू शकतील.

राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची

एमएमआरडीएला ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी या जमिनी विनामूल्य हस्तांतरित केलेली आहे. या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकारचा सक्रिय पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यासह बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे या जमिनींचे जलद हस्तांतरण सुनिश्चित झाले आहे, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी लागणारा खर्च आणि वेळ या दोन्हींची बचत होणार आहे.

(हेही वाचा राहुल शेवाळेंनी सांगितला ‘भारत’ आणि ‘इंडिया’चा अर्थ; म्हणाले, I.N.D.I.A. शब्दात पारतंत्र्याचा वास )

मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून, निर्माणाधिन असलेल्या ७ मार्गिकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्राधिकरण प्रयत्नशील आहे. हे सर्व प्रकल्प महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प असून त्यांच्यामुळे नागरिकांना अतिरिक्त आणि जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. सध्या ३ मेट्रो मार्गिका कार्यान्वित असून त्यांच्यामुळे लाखो मुंबईकर रोज सुखावत आहेत. तर ७ मार्गिका प्रगतीपथावर आहेत. या सर्व मेट्रो मार्गिकांचे देखभाल दुरुस्तीसाठी मेट्रो डेपो हा प्रकल्पातील अविभाज्य घटक असल्याने त्यांची उभारणी देखील तितकीच महत्त्वाची असते.

ठाणे ते नवी मुंबई प्रवास देखील काही मिनिटांत शक्य

२०.७ किमी लांबीच्या प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्ग १२ च्या संरेखनचा विस्तार करून ती नवी मुंबई मेट्रो सोबत जोडण्यासाठीचा आवश्य तो अभ्यास सध्या सुरू असून त्या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. मेट्रो मार्ग १२ कल्याण तळोजा ही मार्गिका, मेट्रो मार्ग ५ ठाणे- भिवंडी- कल्याण या मर्गिकेसोबत जोडली जाणार आहे. असल्याने ठाणे ते नवीमुंबई प्रवास देखील काही मिनिटांत शक्य होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.