कितीही गौरव यात्रा काढल्या, तरी वीर सावरकरांच्या कार्यापुढे त्या कमीच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

190

वीर सावरकरांची ओळख, त्यांचे कार्य, त्याग थोड्या-थोडक्या वेळात मांडणे अशक्य आहे. त्यांची प्रखर देशभक्ती, राष्ट्राभिमान, जाज्ज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार आणि समाज सुधारणेसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. समाजसुधारक, लेखक, कवी, भाषाप्रभू अशा कितीही उपाध्या त्यांना द्याव्या तितक्या त्या कमीच आहेत. त्यामुळे आम्ही कितीही गौरव यात्रा काढल्या, तरी त्यांच्या कार्यापुढे त्या कमी पडतील, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर आणि यात्रेचाच उद्देश पुढे नेत ‘मी सावरकर’ या स्वातंत्र्यवीरांवर आधारित सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, ५ एप्रिल २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर, वीर सावरकरांची नात असिलता राजे, संगीतकार श्रीधर फडके, निरुपणकार डॉ. संजय उपाध्ये आणि अभिनेता शरद पोंक्षे उपस्थित होते.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, वीर सावरकरांच्या लहानपणीची एक गोष्ट माझ्या वाचनात आली. ते आईसमवेत देवपुजेला बसल्यानंतर अगरबत्तीचा धूर हातात धरायचा प्रयत्न करायचे. तेव्हा त्यांच्या मातोश्री सांगायच्या, हा धूर तुझ्या हातात सापडणार नसला, तरी तो तुझ्या हाताला अगरबत्तीचा सुगंध देऊन जाईल. तशाच प्रकारे, सावरकर समजून घेणे अवघड असले, तरी आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्त्वाचा सुगंध आपल्याला मिळेल.

सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे देशाचे नाही, संपूर्ण देशाचे दैवत आहेत. ते मराठी होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्त्व प्राणाहून प्रिय होते. पण त्यांचा वारसा सांगणारे आज राहुल गांधींच्या गळ्यात गळे घालत आहेत. पण, यापुढे सावरकरांचा जे-जे अवमान करती, त्यांना जशासतसे उत्तर दिले जाईल. राहुल गांधींना सावरकरांवर बोलायचा नैतिक अधिकार नाही. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या त्यागाचा ०.१ टक्का त्याग करण्याची हिम्मत त्यांच्यात नाही, त्यांची तशी पात्रताही नाही. हा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान नाही, तमाम देशभक्त क्रांतिकारकांचा अवमान आहे, असेही शिंदे म्हणाले.

७५ वर्षांनंतरही त्यांना सावरकरांची भीती

अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ब्रिटिशांनी सावरकरांचा अतोनात छळ केला. तिथल्या कैद्यांपैकी केवळ एकट्या सावरकरांच्या छातीवर ‘डी’ असा बिल्ला होता. ‘डी’ म्हणजे मोस्ट डेंजरस. त्यावेळच्या ३६ लाखांच्या भारतीयांमध्ये एकटे सावरकर ब्रिटिशांना मोस्ट डेंजरस वाटायचे. त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा झाली. याचा अर्थ सावरकर आपली सत्ता उलथवून टाकतील, अशी भीती त्यांना होती. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झालीत, तरी सावरकर अनेक लोकांना डेंजरस वाटतात. हे त्यांचे कर्तुत्त्व आहे, हे त्यांचं हिदुत्त्व आहे, हीच त्यांची देशभक्ती आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक सावरकरांच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे. कारण सावरकर आणि त्यांच्या हिंदुत्त्वाचे विचार लोकप्रिय झाले, तर आमचा कायमचा बाजार उठेल, अशी भिती त्यांना आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

…म्हणून आम्ही बाहेर पडलो

मागच्या सरकारमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव आणण्याची मागणी पुढे आली. पण त्यांना तो आणता आला नाही. म्हणून तर हा एकनाथ शिंदे सगळे सोडून बाहेर पडला. मला काय होईल ते माहिती नव्हते, पण निघालो ते निघालो. बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्त्वाचे विचार या राज्यात रुजवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.