उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सामील होणार आहेत, असा खळबळजनक खुलासा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यामुळे राज्याच्या राजकरणात चर्चेला उधाण आले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी काहीही लपवून ठेवत नाही. माझे जे आहे, ते सगळे उघडे आहे, असे विधान करत नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून स्पष्ट बोलणे टाळले.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंह थापा आमच्यासोबत आले. आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सहभागी होतील. खोके घेतले म्हणता, पण आयुष्यभर बाळासाहेबांची सेवा करणारा चंपासिंह थापाने काय केले? त्यांनी बाळासाहेबांच्या चरणी संपूर्ण आयुष्य घालवले, ते देखील उद्धव ठाकरेंना सोडून आमच्यासोबत आले आहेत. थापा आला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा प्रताप सरनाईकांच्या पुत्राला युवासेनेच्या कार्यकारिणीतून वगळले, नेमके कारण काय?)
शिंदे गटाची समजूत काढायला गेलेले नार्वेकर
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येणार की नाही माहीत नाही. आज माझा वेगळा मूड आहे. मी काहीही लपवून ठेवत नाही. माझे जे आहे, ते सगळे उघडे आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांनी स्पष्ट काहीच न सांगितल्याने नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सवाच्या काळात मिलिंद नार्वेकरांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेतून बाहेर पडले असले, तरी शिंदेंनी नार्वेकरांसोबत संवाद कायम राखला आहे. तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना आमदार रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना चर्चेसाठी सूरतला पाठविले होते. यात विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक हे शिंदेंच्या सोबत गेले आहेत.
Join Our WhatsApp Community