एमआयएम – शिवसेना युती हे कोणाचं कारस्थान?

165

दोन दिवसांपासून एमआयएम शिवसेना युती यावर बरीच चर्चा होत आहे. एमआयएमने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला आघाडी करण्याची ऑफर दिली. यावरुन मीडियामध्ये बरीच राजकीय चर्चा रंगत आहे. पण एकाही पत्रकाराला ही चर्चा अचानक कशी रंगली आणि एखादा पक्ष जाहीरपणे दुसर्‍या पक्षाला कधी ऑफर देतो का? असा प्रश्न पडला नाही.

आताच काही राज्याच्या निवडणुका पार पडल्या. यात पंजाब वगळता इतर राज्यात भाजपने बाजी मारलेली आहे. आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात पालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अजून दिनांक जरी निश्चित झालेली नसली, तरी आता राजकीय पक्षांनी आपलं रणशिंग फुंकलेलं आहे. त्यात मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा जीव की प्राण! काही राजकीय वर्तुळात अशी चर्चा असते की शिवसेना हा पक्ष मुंबई महानगरपालिकेमुळे उभा आहे. गेली साधारण ३ दशकं मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे.

बाळासाहेबांच्या निधनानंतर हिंदुत्व अजेंडा हरवला?

आता काश्मिर फाईल्स हा सिनेमा प्रदर्शित होऊन खूप गाजतोय आणि या सिनेमाने एक वेगळं वातावरण तयार केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सिनेमाची स्तुती केली आहे. भाजपाला इतर राज्यात मिळालेलं यश ही शिवसेना आणि भाजप विरोधकांसाठी खूप मोठी डोकेदुखी आहे. पूर्वी हिंदू वोटबॅंक हा प्रकार नव्हता, मुस्लिम वोटबॅंक मात्र स्वातंत्र्यापासूनच सुरु झालेली आहे. पण २०१४ नंतर हिंदू वोटबॅंक अस्तित्वात आली. आणि भाजपा या पक्षाचा जन्म हिंदुत्व हे धोरण स्विकारुन झालेला आहे व आजतागायत हे धोरण कायम राहिलेलं आहे. शिवसेना मराठी मुद्द्याच्या दारातून आली, पुढे हिंदुत्व हा अजेंडा त्यांनी हाती घेतला. बाळासाहेबांना लोक हिंदुह्रदयसम्राट म्हणून ओळखू लागले. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर हा अजेंडा मागे राहिला. शिवसेनेने आघाडीत प्रवेश केल्यामुळे हा अजेंडा हरवून बसलेला आहे.

एकवेळ राज्याची सत्ता गेली तरी चालेल पण…

आता मुंबई पालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. ही निवडणूक शिवसेनेला काहीही करुन जिंकायची आहे. एकवेळ राज्याची सत्ता गेली तरी चालेल, (शिवसेनेला पालिका गमवायची नाही, हे सांगण्यासाठी ही अतिशयोक्ती केलेली आहे) पण मुंबई आपल्याकडेच राहिली पाहिजे हे शिवसेनेचं धोरण आहे. पण आताची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायची हा मोठा प्रश्न आ वासून शिवसेनेसमोर उभा राहिलेला आहे. बीएमसीच्या विकासकामांवर शिवसेना निवडणूक लढवू शकत नाही. इतकी वर्षे मुंबई आमच्यामुळे वाचली, मुंबईतला मराठी माणूस आमच्यामुळे आहे, हिंदुत्व आमच्यामुळे आहे, हे शिवसेनेचे बीएमसी निवडणुकीतले मूळ मुद्दे राहिलेले आहेत.

(हेही वाचा – काँग्रेस झालं कमकुवत! सुशील कुमार शिंदेंनीच केलं मान्य)

म्हणून होतेय एमआयएम शिवसेना युतीची चर्चा 

आता परिस्थिती अशी झाली आहे की, आपल्याला विकासकामांवर निवडणूक लढवता येत नाही आणि आघाडीत असल्यामुळे हिंदुत्व हा मुद्दा आपण गमावून बसलोय, याची जाणीव शिवसेनेला झालेली आहे आणि म्हणूनच एमआयएम शिवसेना युतीची चर्चा सध्या रंगलेली आहे. पहिली गोष्ट एमआयएम ला आघाडीत यायचं असेल तर ते मीडियासमोर स्टेटमेंट देण्याऐवजी प्रत्यक्ष शरद पवारांना जाऊन भेटतील. मग मीडियासमोर हे सांगण्याची गरज काय होती हाच महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर एमआयएम ने ऑफर दिल्यानंतरची चर्चा बघितली असेल तर तुम्हाला बर्‍याच गोष्टी लक्षात येतील. संजय राऊत यांनी म्हटलं की जे अफझलखानाच्या थडग्यासमोर झुकतात त्यांच्याशी आम्ही युती करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा एमआयएम सोबत युतीची चर्चा झिडकारुन लावलेली आहे. आणि राऊत व ठाकरे दोघांनी मिळून भाजपाचं हिंदुत्व बेगडी आहे असं सांगत त्यांनी मेहबुबा मुफ्तीसोबत युती केली याची आठवण करुन दिली.

एमआयएमने आता सेनेला ऑफर का दिली?

एमआयएमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्यियाज जलील आणि शिवसेना आता समोरासमोर आलेले आहेत. या वादानंतर इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर प्रचंड टीका केलेली आहे. तसं पाहायला गेलं तर कोणतंही कारण नसताना हा वाद पेटवण्यात आलेला आहे. पण जिथे कारण नसतं तिथे राजकारण असतं. कॉंग्रेससोबत गेल्यानंतर भाजपाने शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर डिवचलं होतं. माझ्या मते मुंबई महानगरपालिकेचा भाजपचा निवडणुकीतला मुद्दा हिंदुत्व हाच असणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजपा शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे शिवसेनेने एमआयएमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत ही चर्चा मुद्दामून रंगवलेली आहे असं चित्र सध्या दिसतंय. शिवसेनेकडून राज्यात आघाडीची सत्ता आहे आणि आम्ही चौथ्या पक्षाला घेणार नाही असं सांगण्यात आलं. तर आता राज्याची निवडणूक तर २०२४ मध्ये लागेल. मग एमआयएमने आता त्यांना ऑफर का दिली? आता तर पालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे. मग शिवसेनेचे नेते असं का नाही म्हणत की आम्ही पालिकेत एमआयएम सोबत युती करणार नाही, ते राज्यात युती करणार नाही असं का म्हणतायत? कारण त्यांना एमआयएम सोबत युती करण्यापेक्षा एमआयएम सोबत वाद घालण्यात जास्त रस आहे. आपलं हिंदुत्व भाजपपेक्षा श्रेष्ठ आहे, भाजप मेहबुबा मुफ्तीसोबत युती करते पण शिवसेना मात्र एमआयएम ला सडेतोड उत्तर देते हेच शिवसेनेला दाखवायचं आहे. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र, शिवसेना म्हणजे हिंदुत्व असं त्यांना दाखवायचं आहे. एमआयएम चा अजेंडा अगदी सरळ आहे, त्यांना मुस्लिमांची एकगठ्ठा मते हवी आहेत. शिवसेनेला मात्र बीएमसीतील आपली सत्ता शाबूत ठेवायची आहे. शिवसेना आणि एमआयएम दोघांनाही हा राजकीय वाद हवा आहे. निर्माण केलेला हा हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेला किती फायदेशीर ठरेल हे तर येणारा काळच सांगेल.

(लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.