मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाला शिवसेनेसोबतच इतर पक्षांच्या आमदारांनी देखील पाठिंबा दिला. यामध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू देखील होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडूंना स्थान न देण्यात आल्यामुळे ते नारज असल्याची चर्चा होत आहे. त्यातच शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडू यांच्याबाबत मिश्कील विधान केले आहे.
बच्चू कडू यांना कडू द्यायचं, गोड द्यायचं की खारं द्यायचं याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मात्र याबाबत सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मी फक्त नावातला फरक सांगितला
अब्दुल सत्तार हे सध्या मेळघाट दौ-यावर आहेत. त्यावेळी त्यांनी कडू यांच्याबाबत भाष्य केले आहे. बच्चू कडू यांच्या नावामध्ये कडू आहे. राजकुमार पटेल हे राजकुमार आहेत आणि ते गोड आहेत. त्यामुळे हे कोणतेही राजकीय विधान नसून मी या दोघांच्या नावामधील फरक सांगितला आहे, असे विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
ते कडू का?
बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे नेते आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने चांगले काम केले आहे. पण त्यांच्या नावामध्ये कडू का आहे हे तेच सांगू शकतील, मला त्याबाबत काही माहिती नाही. विधीमंडळ अधिवेशनातही बच्चू कडू यांनी शेतक-यांच्या प्रश्नावरुन आवाज उठवला होता त्यामुळे देखील कडू हे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते.
(हेही वाचाः पंकजा मुंडे भाजप सोडणार? भावाने स्पष्टच सांगितले)
पण बच्चू कडू हे कधीही नाराज होत नाहीत. ते शेतक-यांचे कैवारी आणि दीन-दुबळ्या गरिबांसाठी आवाज उठवणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही मिश्कील टिप्पणी करू शकत नाहीत कारण तेच इतके मिश्कीलपणे बोलत असतात, असा टोलाही सत्तार यांनी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community