Ashish Shelar : महाराष्ट्र शासनाने श्रमकवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (Birth centenary of Narayan Surve) विशेष उपक्रम हाती घेतले असून. त्यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमांची निर्मिती सांस्कृतिक संचालनालयामार्फत करण्यात येईल. तसेच, राज्यभर कामगार साहित्याचा जागर घालण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. गुरुवारी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिरात (Rabindra Natya Mandir) ‘मराठी आठव दिवस’ च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुर्वे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Ashish Shelar)
नारायण सुर्वे – ‘नाही रे’ वर्गाचे शेक्सपिअर
कार्यक्रमात बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या योगदानाचे कौतुक करताना त्यांना ‘नाही रे’ वर्गाचे शेक्सपिअर असे संबोधले. त्यांनी सांगितले की, “नारायण सुर्वे (Poet Narayan Surve) हे केवळ कामगार कवी नव्हते, तर समाजाच्या तळागाळातील लोकांचे हक्क व अधिकार शब्दांमधून मांडणारे एक सशक्त लेखक होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार केला जाईल.”
(हेही वाचा – Bhaskar Jadhav यांचे स्वप्नभंग; jacket चढवले अन् आठ दिवसात उतरवले!)
कामगार साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट साहित्यिकासाठी ५० हजार रुपयांचा पुरस्कार
नारायण सुर्वे यांच्या साहित्याला अभिवादन करण्यासाठी आणि श्रमिक साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी, पुढील वर्षापासून ‘मराठी आठव दिवस’ च्या नारायण सुर्वे वार्षिक साहित्य संमेलनात श्रम साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या एका साहित्यिकाला ५० हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी जाहीर केले. हा पुरस्कार ते स्वतः वैयक्तिकरित्या देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुर्वे साहित्य संमेलनात मान्यवरांचा गौरव
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार होते. दिवसभराच्या या कार्यक्रमात श्रमिक साहित्य, मराठी भाषा संवर्धन आणि साहित्य चळवळीला योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला. ‘मराठी आठव दिवस’ च्या प्रारंभापासून पाठीराखे असलेल्या भाऊ कोरगावकर, डॉ. महेश केळुसकर आणि अशोक नायगावकर यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. तसेच, नवोदित साहित्यिकांमध्ये प्रदीप आवटे, योगिता राजकर, मधुकर मातोंडकर, सुनील उबाळे, सुजाता राऊत आणि सफरअली इसफ यांना ‘जाहीरनामा पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
(हेही वाचा – औरंगजेबची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळा; माजी खासदार Rahul Shewale यांची केंद्र सरकारकडे मागणी)
मराठी आठव दिवस उपक्रमाला राज्यभरातून पाठिंबा
‘मराठी आठव दिवस’ हा उपक्रम (Marathi Aathav Diwas activity) गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आयोजित केला जात आहे. प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला हा कार्यक्रम होतो आणि राज्यभरातून अनेक मराठी दानशूर व्यक्ती यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. या उपक्रमाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत संस्थापक रजनीश राणे यांनी सांगितले की, “मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी हा एक मोठा लोकचळवळीचा भाग बनला आहे. येत्या काळात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाईल.” या संमेलनाने कवी नारायण सुर्वे यांच्या कार्याला नव्या उंचीवर नेण्याची ग्वाही दिली असून, त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या उपक्रमांची उत्सुकता वाढली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community