भाजपचे आता मिशन ‘परब’

भाजपच्या सर्व नेत्यांचे आता परबांना अडचणीत आणण्याचे मिशन असल्याची माहिती मिळत आहे.

103

नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचे नुकतेच भाजप आमदार किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. त्यातच नारायण राणे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर अनिल परब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता भाजपने अनिल परबांविरोधात दंड थोपटले असून, भाजपच्या सर्व नेत्यांचे आता परबांना अडचणीत आणण्याचे मिशन असल्याची माहिती मिळत आहे.

राणे जाणार न्यायालयात

नारायण राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत असून, परब यांची एक व्हिडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यावरुन नारायण राणे हे आता या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की, पकडा त्याला, अरे काय सुरू आहे. अनिल परब यांच्या एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरू राहील, असे राणेंनी म्हटले आहे.

(हेही वाचाः आधीच ठरला राणेंच्या अटकेचा प्लॅन? हे आहेत खरे सूत्रधार)

शेलार म्हणाले सीबीआय चौकशी करा

ज्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली नव्हती, तेव्हा राणे यांच्या अटकेसाठी शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब रत्नागिरी जिल्हा पोलिसांवर दबाव आणत होते. त्याबाबतची ध्वनीचित्रफीत समोर आली असून, या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत(सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाबाबत चुकीचा उल्लेख केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे क्षमायाचना करणार का?, असा सवालही त्यांनी केला.

परबांचा गृह खात्यात हस्तक्षेप

राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब मंगळवारी 11 ते 1 दरम्यान रत्नागिरी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीत होते. त्यादरम्यान एका आयपीएस अधिकाऱ्याला दूरध्वनीवरुन राणे यांना अटक करण्यासंदर्भात आदेश देत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाली आहे. गृहमंत्री नसतानाही परब यांनी राणे यांच्या अटकेसाठी आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचेही या संवादातून दिसत आहे. अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती, राणे प्रकरणी हेच अधोरेखित झाले आहे. परब यांचा गृह खात्यामधला हस्तक्षेप गंभीर आहे, असा दावा शेलार यांनी केला.

(हेही वाचाः राणेंना १७ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण)

काय आहे नेमकं परबांच्या क्लिपमध्ये?

मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारुन घेतो सीएम साहेबांना. हो… फक्त मी ठरवतो, मग तसं आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावं लागेल ना? हो हो हो… मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. काय करताय तुम्ही लोकं?? नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये? ऑर्डर कसली मागतायेत ते? अहो हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे. पोलिस फोर्स वापरुन ताब्यात घ्या. अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची ठिकाय. ओके…

नंतर झाली चर्चा

फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं. मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलिस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली आता पोलिस ओढून बाहेर काढतायेत, असे संभाषण त्या व्हिडिओत आहे.

(हेही वाचाः उद्धव ठाकरेंची विधाने असंविधानिक नाहीत का? राणेंचा सवाल… कोणती आहेत ‘ती’ विधाने?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.