संप बेकायदेशीरच! गैरहजर कर्मचाऱ्यांची पगार कपात?

73

मागच्या काही दिवसांपासून एसटी कर्मचा-यांचा संप सुरु आहे. सरकारने बैठकांचे सत्र चालवूनही संपावर तोडगा काढण्यात सरकारला अपयश आले आहे. जोपर्यंत विलिनीकरण होतं नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, या मतावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. पण आता कामगार न्यायालयाने या संपालाच बेकायदेशीर ठरवल्याने हा संप लवकरच संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आता संपकाळात जे कर्मचारी कामावर गैरहजर होते त्यांना या महिन्याचा पगार देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आपली भूमिका मांडली आहे.

दिवसाला आठ दिवसांचा पगार कापणार? 

कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर ठरवल्याने आता संपकाळात गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे काय? याबद्दल अनिल परब यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, कामगार न्यायालयाने जर संप बेकायदेशीर ठरवला, तर अशी तरतूद आहे की, एका दिवसाला आठ दिवसांचा पगार कापावा लागतो. कामगारांनी या सगळ्याचा विचार करावा. राज्य शासनाची अशी कोणतीच इच्छा नाही की, कामगारांचे आर्थिक नुकसान करावे. परंतु, जे संपावर आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ‘नो वर्क नो पे’ हे तर करणारच, पण एक दिवसाला आठ दिवस कापणे हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. आम्हाला अशा कोणत्याही कारवाईला भाग पाडू नका, असे आवाहन मी कर्मचाऱ्यांना करत आहे. तसेच त्यांनी लवकरात लवकर कामावर यावे, असे आवाहनही मी त्यांना करतो, असे अनिल परब म्हणाले.

…तर भूमिका कठोर करु!

सातव्या वेतन आयोगानुसार एसटी कर्मचा-यांना पगार मिळाला पाहिजे, अशी एसटी कर्मचा-यांची मागणी होती. आताचा पगार आणि सातव्या वेतन आयोगानुसारचा पगार यासंदर्भात निर्णय चर्चा करुन घेतला जाईल. चर्चेने प्रश्न सुटतात. त्यामुळे समितीचा अहवाल जसा येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल. आम्ही कुठल्याही गोष्टीला आत्तापर्यंत नकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही, आम्ही सकारात्मकच प्रतिसाद दिला आहे. मात्र तरीही हट्ट करुन एसटीचे नुकसान करुन जर कोणी राज्य शासनाशी लढत असेल, तर मात्र राज्य शासन आपली भूमिका कठोर करेल, असे अनिल परब पुढे म्हणाले.

 (हेही वाचा :  26/11…अफगाणिस्तानातील अमेरिकेची बेवारस शस्त्रास्त्रे भारतासाठी धोकादायक )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.