सध्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे दापोली तेथील रिसॉर्टचा वाद मिटता मिटेना. हे रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही असा दावा अनिल परब करत आहेत, मात्र त्यांचा हा दावा खोटा असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार पुराव्यानिशी सांगत आहेत. आता तर सोमय्या यांनी या जमिनीचा सध्याचा मालक सदानंद कदम यांचे पत्र पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहे. त्यात सदानंद कदम यांनी हे रिसॉर्ट आणि त्याची जागा ही अनिल परब यांच्या मालकीची होती, त्यांच्याकडून आपण खरेदी केली आहे, असा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
दापोली रिसॉर्ट संबंधी कागदपत्रे आपण पोलीस महासंचालकांना दिले आहेत. त्यात सदानंद कदम यांचे पत्र आहे. सदानंद कदम हे मंत्री अनिल परब यांचे पार्टनर आहेत आणि सदानंद कदम हे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे धाकटे भाऊ आहेत. सदानंद कदम यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २७ जानेवारी २०२१ रोजी लिहिले होते. त्यात ते स्पष्टपणे म्हणतात की, दापोली येथील जमीन आणि रिसॉर्ट अनिल परब यांच्या नावाने आहे, त्यांच्याकडून ही जमीन मी खरेदी केली आहे. ती माझ्या नावाने करावी, अशी विनंती, असे सदानंद कदम स्पष्टपणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘तेरा क्या होगा कालिया’, वर्षभर किती खोटे बोलता. तुम्ही खोटे बोलता की उद्धव ठाकरे तुम्हाला खोटे बोलायला सांगतात. ही मालमत्ता जुलै २०२१ मध्ये सदानंद कदम यांच्या नावाने हस्तांतर झाली आहे. किरीट सोमय्या यांनी हे पत्र उघड केल्यामुळे दापोली रिसॉर्ट हे अनिल परब यांच्याच नावाचे होते, याची पुष्टी मिळत आहे. त्यामुळे परब यांचा अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Join Our WhatsApp Community