बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री दादा भुसे हे कायमंच संयमी दिसतात. मात्र त्यांच्यातील दबंग व्यक्तिमत्व नुकतेच संपूर्ण महाराष्ट्राला पहायला मिळाले आहे. दादा भुसेंनी चक्क हातात पिस्तूल घेऊन दरोडा घालायला आलेल्या दरोडेखोराला स्वतः पकडून देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. नाशिकच्या मालेगाव येथे ही घटना घडली आहे. भुसे हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
दादांचे धाडस
मालेगाव येथील कलेक्टर पट्टा या भागात सोमवारी भरदिवसा दरोडा घालण्याच्या उद्देशाने दोन-तीन जण हातात पिस्तूल घेऊन एका बंगल्यात शिरले. त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी धाडस दाखवत त्यातील एका पुस्तूलधारी दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भुसे यांच्या या धाडसामुळे त्या बंगल्यातील तीन महिलांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः साकीनाक्यात दुकानांना आग, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न)
इतकंच नाही जे साथीदार पळून गेले आहेत त्यांची नावे ताबडतोब सांग नाहीतर तुला महागात पडेल, असा सज्जड दमही भुसे यांनी यावेळी या दरोडेखोराला भरला आहे.
काय झाले नेमके?
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोषी यांच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने आणि पैसे असतील त्यामुळे त्यावर डल्ला मारण्याच्या हेतूने सोमवारी दुपारी चोरटा बंगल्यात शिरला. त्याने पिस्तूलाचा धाक दाखवत बंगल्यातील महिलांकडे दागिने आणि पैशांची मागणी केली. घाबरलेल्या महिलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने स्थानिक बंगल्याबाहेर गोळा झाले. त्यावेळी दादा भुसे देखील त्याच परिसरात होते. त्यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने बंगल्याकडे धाव घेत चोरट्याला शरण येण्यास सांगितले. त्यानंतर दोन तासांनी शरण आलेल्या या दरोडेखो-याला कार्यकर्तयांनी चांगलाच चोप दिला आहे.
Join Our WhatsApp Community