कोरोनाचा नियम मोडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मंत्र्यांचे अभय; सेना आमदाराचा घरचा आहेर

कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. रत्नागिरीमधील खेड तालुक्यात या नियमांची पायमल्ली केली जात आहे. तालुक्यातील पोलीस अधिकारी सुवर्ण पत्की यांच्याकडून क्रिकेट सामान्यांच्या आयोजनास संमती देण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला.

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेड तालुक्यातील अधिकाऱ्याला शिवसेनेच्या मंत्र्यांकडूनच अभय दिले जात आहे, असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधान परिषदेत करत सरकारला घरचा आहेर दिला. यावेळी अधिवेशन कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

शिवसेनेचा मंत्रीच देतोय साथ

कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. रत्नागिरीमधील खेड तालुक्यात या नियमांची पायमल्ली केली जात आहे. तालुक्यातील पोलीस अधिकारी सुवर्ण पत्की यांच्याकडून क्रिकेट सामान्यांच्या आयोजनास संमती दिली जात आहे. क्रिकेट सामान्यांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही सामन्यांना संबंधित पोलीस अधिकारी हजेरी लावत आहेत. लेखी तक्रार याबाबत केल्यानंतर जिल्ह्यातील मंत्री कारवाई करू नये, यासाठी दबाव टाकत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना विधान परिषदेचे सदस्य रामदास कदम यांनी तारांकित प्रश्नाच्या तासाला केला. शिवसेनेचा मंत्रीच साथ देतोय, हा काय प्रकार आहे, त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, अशी खंत कदम यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा : कंगना म्हणते शिवसेनेकडून जिवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलमध्ये हस्तांतरीत करा! )

दारूच्या भट्ट्या

तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दारूच्या भट्ट्या चालतात. पोलीस अधिकारी हप्ते घेत असल्याने भट्ट्या राजरोसपणे सुरू आहेत, असा आरोप कदम यांनी केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास विधानभवनासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, संबंधितांची चौकशी करून अधिवेशन कालावधी संपण्यापूर्वी कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here