अखेर आव्हाडांना अटक झालीच! काय म्हणाले करमुसे?

पोलिसांनी तब्बल दीड वर्षांंनी आव्हाडांवर अटकेची कारवाई केली, त्यानंतर त्यांना लगेचच जामीन देण्यात आला. त्यामुळे करमुसे यांनी नाराजी व्यक्त केली.

139

ठाणे घोडबंदर येथील आनंद नगर येथे राहणारे श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान या संघटनेचे ठाणे शहर कार्यवाह अनंत करमुसे यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशावरून ५ एप्रिल २०२० रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी जबर मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांनी तीन अंगरक्षकांना अटक केली होती, मात्र आव्हाड यापासून सुरक्षित होते, परंतू अखेर ठाणे पोलिसांनी तब्बल दीड वर्षांंनी आव्हाडांवर अटकेची कारवाई केली. त्यानंतर त्यांना लगेचच जामीन देण्यात आला. त्यामुळे करमुसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गुन्हे गंभीर असूनही तात्काळ जामीन

या प्रकरणात पोलिसांनी आव्हाडांना गुरूवारी, १४ ऑक्टोबर रोजी तात्पूर्ती अटक दाखवून गुपचूप न्यायालयात हजर केले आणि न्यायालयानेही आव्हाडांना १० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे पोलिसांनी ही कारवाई अत्यंत गुप्तपणे केली. परंतू भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिल्यावर खळबळ उडाली. आव्हाडांना करमुसे यांचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई केली. हे गुन्हे गंभीर असतानाही आव्हाडांना जामीन कसा देण्यात आला, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आव्हाडांवर भादंवि कलम ३६५, ३२४,१४३,१४७, १४८ आणि ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सरकारकडूनच जामिनाची व्यवस्था – प्रवीण दरेकर

या प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत होती. मात्र, त्यांचेच सरकार असल्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नसेल. मात्र आता न्यायालयाच्या काही अडचणी अल्या असतील. तसेच इतर संभाव्य अडचणी आल्या असतील, त्यामुळे ऑनरेकॉर्ड अटक दाखवली असेल. पण सरकार यांचेच असल्यामुळे जामिनाची व्यवस्था करुन ठेवली असेल.

(हेही वाचा : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी वादाला सुरुवात! उद्धव ठाकरे करतील का खुलासा?)

काय आहे प्रकरण?

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी ठाण्यातील केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी करमुसे यांना त्यांचा घरातून उचलून नेऊन बंगल्यावर आणले आणि तिथे त्यांना जबर मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्यांनी केला. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला.

मी असमाधानी – अनंत करमुसे

जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली असेल तर ज्या लोकांना त्रास देण्यात आला, कुणाचे मुंडन करण्यात आले, कुणाच्या घरी जाऊन मारहाण करण्यात आली, त्या सर्वांचा हा विजय आहे. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असेच कायद्याने यांच्याशी लढत राहिल. अटक झाली आणि सुटका झाली यावर मी समाधानी नाही त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यादिवशी मला घरातून बाहेर नेण्यात आले. माझ्या घरच्यांना खोटे सांगून मला बाहेर नेण्यात आले होते. ज्यांनी बाहेर नेले ते पोलिस आजसुद्धा नोकरीवर आहेत. त्यांनासुद्धा 2 तासात जामीन देण्यात आलेला आहे. जे मला अजिबात पटलेले नाही. खाकीवरच्या विश्वासाने मी त्यांच्याबरोबर गेलो होतो, त्याला डाग लागला आहे. जोवर या पोलिसांना बडतर्फ करत नाही, तोवर मला न्याय मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया अनंत करमुसे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.