मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीवर एक उच्चभ्रू व्यक्ती गंभीर स्वरूपाचे अत्याचार करत आहे. या प्रकरणी संबंधित महिलेला मदत करणारे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी आव्हाडांनी फोनवरून दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे आव्हाडांच्या या दादागिरीचे हे पहिलेच प्रकरण नाही. याआधीही त्यांनी ५ एप्रिल २०२० रोजी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी अनंत करमुसे यांना त्यांच्या घरातून उचलून बंगल्यावर आणले आणि पोलिसांकरवी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती.
राज्यपालांकडे केली आव्हाडांची तक्रार!
राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी या प्रकरणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटून आव्हाडांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. त्यामध्ये पुजारी यांनी म्हटले आहे की, मुंबईत राहणाऱ्या एक तरुणीवर अनेक वर्षांपासून एका उच्चभ्रू व्यक्तीकडून सतत गंभीर स्वरूपाचे अत्याचार होत होते, मात्र त्या तरुणीची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती. त्यामुळे संबंधित तरुणी आपल्याकडे मदत मागायला आली. आपण त्या तरुणीला मदत करतानाच अंधेरी डी.एन. नगर पोलिस ठाण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला. त्याचा राग मनात धरत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आव्हाड म्हणाले की, ‘…(शिवी) तू एका मुलीसाठी कुणाला तरी ब्लॅकमेल करतोस, मुलगी गेली (शिवी) …., तिला मरू दे, तुला माहीत आहे का भूषण कुमार टी-सीरीजचा मालक आहे. तू या प्रकरणात पडू नकोस, खूप मोठी माणसे विरुद्ध बाजूने आहेत. तुझे काही खरे नाही’, असे म्हणाले. तसेच पीडित तरुणीबाबतही लज्जास्पद आणि आर्वाच्च भाषेत बोलले. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचे आणि राज्याच्या राजधानीत महिलांना नराधमांच्या दुराचाराकरता सोडायचे. अत्याचार करणाऱ्याचे स्टेट्स पाहून न्याय द्यायचा. पीडितांना मदत करणाऱ्या लोकांना सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावायचे, जीवे मारण्याची धमकी द्यायची, खोट्या केसेस दाखल करायच्या आणि लोकशाही असल्याचा डंका बडवायचा, हे योग्य नाही. यापूर्वीही या मंत्र्याने सामाजिक कार्यकर्त्याला घरातून आणून मारले आहे. माझ्या जीवितालाही या मंत्र्याकडून धोका आहे. संबंधित मंत्र्याविषयी माझी तक्रार आहे. आव्हाड यांनी आमदार आणि मंत्रीपद स्वीकारताना महामहीम राज्यपाल यांच्यासमोर घेतलेली शपथ खोटी ठरवली आहे. शपथेचा आणि राज्यघटनेचा अवमान जितेंद्र आव्हाडांकडून झालेला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा.
ऑडिओ क्लिप व्हायरल!
मंत्री आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारी यांचातील फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये आव्हाड हे संबंधित पीडित महिलेला मदत न करण्याविषयी पुजारी यांच्यावर दबाव टाकताना आढळून येत आहेत. यावेळी आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.