महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतानाचे नाव देण्यात आले होते, ज्यामुळे मोठा वाद पेटला होता. त्याला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला होता. आता राज्यात सत्तांतर झाले असून राज्यात शिवसेना -भाजप युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आता या उद्यानाला टिपू सुलतानाचे नाव काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
काय आहे प्रकरण?
जिल्हा नियोजन समितीमध्ये यासंदर्भात खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह इतर काही सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर हे नाव काढून टाकण्याची सूचना केल्याचे लोढा यांनी सांगितले. मालाड पश्चिम येथील एका उद्यानाला टिपू सूलतान यांचे नाव देण्यात आले होते. या नावाला विरोध दर्शवत भाजप आणि बजरंग दलाकडून त्या ठिकाणी गेल्या वर्षी आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे याप्रकरणी राजकीय वाद उभा राहिला होता. गेल्या वर्षी २६ जानेवारीलाच हे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई उपनगराच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला होता. शेट्टी यांच्या या मागणीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी पाठिंबा दर्शविल्याने हे नाव काढून टाकण्याची सूचना मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. लवकरच या आदेशाची पूर्तता होणार आहे. मात्र उद्यानाला नवे नाव कोणते देणार याबाबत अजून निर्णय झाला नाही.
(हेही वाचा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी; सन्मान निधी योजनेअंतर्गत आता ८ हजार देणार?)
Join Our WhatsApp Community