मंत्री नवाब मलिक यांना होणार अटक?

97

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला ईडीने अटक केल्यानंतर मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीच्या तपासाला वेग आला आहे. इकबाल कासकर याची आज ईडी कोठडी संपत असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, तत्पूर्वी इकबाल कासकर आणि नवाब मलिक यांची समोरासमोर चौकशीसाठी मलिक यांना सकाळीच ईडीने ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणले आहे. १९९३च्या बॉम्ब स्फोटातील आरोपीकडून बेकायदेशीररित्या जमीन खरेदी केल्याचा आरोप मलिकांवर असून या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता ईडी सूत्राकडून वर्तवली जात आहे.

डी कंपनी संबंधीत १० ठिकाणी छापेमारी

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने डी कंपनी विरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर डी कंपनीच्या संबंधित अनेकांकडे ईडीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान ईडीने डी कंपनी संबंधीत १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती, तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याला तळोजा तुरुंगातून ताब्यात घेऊन ईडीने त्याला अटक केली आहे. इकबाल कासकर याच्याकडे बेकायदेशीर संपत्तीबाबत चौकशी सुरू असताना त्याने चौकशीत नवाब मलिक यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे समोर येत आहे. दरम्यान आज (बुधवारी) इकबाल कासकर याची ईडी कोठडी संपत आहे, इकबाल कासकर याच्या चौकशीत मलिक यांचे नाव आल्यामुळे मलिक आणि इकबाल यांची समोरा समोर चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी बुधवारी सकाळीच बंदोबस्तात नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील नूर मंजिल येथे दाखल झाले.

(हेही वाचा मलिकांचं दाऊद कनेक्शन? ईडीने घेतलं ताब्यात अन्…)

पावणे आठ वाजता मलिक यांची चौकशी

नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकारी यांनी नोटीस देऊन ताब्यात घेतले. पावणे आठ वाजता मलिक यांना ईडी कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. इकबाल आणि मलिक यांची समोरा समोर कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड येथील जमीन खरेदी प्रकरणात चौकशी सुरू आहे. ईडीच्या हाती या संदर्भात काही पुरावे मालिकांच्या विरोधात हाती लागलेले आहेत, या अनुषंगाने नवाब मलिक यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मात्र ईडीकडून अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

ईडीवर दबाब ….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याचे वृत्त पसरताच कुर्ला, चेंबूर अणुशक्ती नगर येथील मलिक यांचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मलिक यांच्या कुर्ल्यातील नूर मंजिल या इमारतीसमोर एकत्र जमा झाले. त्यानंतर मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान हे नूर मंजिल मधून बाहेर पडताच कार्यकर्ते त्याच्या पाठोपाठ बाहेर पडले आणि ईडी कार्यालयाजवळ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर धडकले. कार्यकर्त्यांनी ईडी आणि केंद्रीय सरकार विरोधात घोषणा बाजी देत ईडी च्या कार्यालयात घुसण्यचा प्रयत्न केला, यावेळी मुंबई पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखले. नवाब मलिक यांचे अपहरण करण्यात आले असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहे. ईडीवर दबाब आणण्याचा प्रयत्न मलिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.