मंत्र्यांची दिशाभूल करून परस्पर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला दणका

106

मंत्री आणि मंत्री कार्यालयाची दिशाभूल करून परस्पर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दणका दिला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश चव्हाण यांनी दिले आहेत.

भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या धान उत्पादक जिल्ह्यांतील धानापासून तयार झालेला सी.एम.आर (तांदूळ) इतर जिल्ह्यांना उचल व वाटप करण्यासंदर्भातील आराखडा तयार करून २०२० मध्ये त्यास शासनाची मान्यता घेण्यात आली आहे. परंतु, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर देवदत्त तुंगार यांनी या विषयाबाबतच्या फाईलवर मंत्री चव्हाण यांची मान्यता न घेता परस्पर निर्णय घेतला. शिवाय २० सप्टेंबर २०२२ च्या पत्रान्वये उचल व वाटप करण्यासंदर्भात सूचना दिल्या. विशेष म्हणजे हा निर्णय घेतल्यानंतर फाईल केवळ सोपस्कर म्हणून मंत्री चव्हाण यांच्या अवलोकनार्थ सादर केली.

मंत्री कार्यालयाची दिशाभूल करून व त्यांना अंधारात ठेऊन तुंगार यांनी कृती केल्याचे उघड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात प्रतिनियुक्तीने कार्यरत असणारे सहसचिव तुंगार यांची रवानगी तात्काळ मूळ विभागात करण्याचे आदेश दिले. तुंगार यांनी हेतुपुरस्सरपणे केलेली कृती ही शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे, त्यामुळे या प्रकरणात ते प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे निर्दशनास आले असून, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे लेखी आदेश मंत्री चव्हाण यांनी विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.