मंत्री भुमरे यांची ‘का’ वाढली अडचण? वाचा…

मंत्री भुमरे यांचा माफीनामा धूळफेक करणारा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सुनावले.

143

कोरोना महामारीतही गर्दी करून उद्घाटनाच्या कार्यक्रमांचा सपाटा लावल्याप्रकरणी राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. त्यावर मंत्री भुमरे यांनी खंडपीठात माफीनामा सादर केला. मात्र न्यायालयाने तो न स्वीकारता उलट जर पोलिसांकडे मंत्री भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केल्यास त्याची कायद्याच्या दृष्टीने दखल घ्यावी, असा आदेश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी.यू. देबडवार यांनी दिला.

काय म्हटले मंत्री भुमरे यांनी माफीनाम्यात! 

देवगावात कार्यक्रम आयोजित केल्याची आपल्याला माहिती नव्हती. तिथे ग्रामस्थांची गर्दी पाहून मलाही आश्चर्य वाटले. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करण्याचा माझा कोणताही हेतु नव्हता. जे घडले त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. रोजगार हमी योजनेतून बेरोजगारांना काम मिळावे म्हणून मी मतदारसंघात दौरे करत असतो.

(हेही वाचा : धनू भाऊंची ‘ती’ प्रेमकथा आता उलगडणार!)

मंत्र्यांचा माफीनामा धूळफेक करणारा!

सुनावणीच्या वेळी मंत्री भुमरे यांनी बिनशर्त माफी मागितल्याने गुन्हा नोंदवण्याचे कारण नाही, असे मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे म्हणाले. त्यावर खंडपीठाने तीव्र ताशेरे ओढले. मंत्र्याने आपल्या मतदारसंघात अचानक भेट दिली, अचानक तेथे ग्रामस्थ जमले, अचानक भूमिपूजनाचा कार्यक्रमही सुरू झाला, असा योगायोग होणे अशक्य आहे. त्यामुळे मंत्र्यांनी जे म्हणणे मांडले आहे तो धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत खंडपीठाने खडेबोल सुनावले व भुमरे यांचा बिनशर्त माफीनामाही स्वीकारण्यास नकार दिला. तसेच, न्यायालयाने मंत्री भुमरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असा दत्तात्रय गोर्डे यांनी सादर केलेला दिवाणी अर्जही फेटाळला. मात्र, गोर्डे यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या संदर्भाने अर्ज केला तर त्यावर कायद्यानुसार कार्यवाही करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.