बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच वाटप करण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी हिंगोली येथील आमदाराकडून कंत्राटदाराला केलेली मारहाण प्रकरण मांडले, अधिकाऱ्याने निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्यामुळे संबंधित आमदाराने मारहाण केली, त्यात अन्न निकृष्ट दर्जाचे होते का, नसेल तर संबंधित लोकप्रतिनिधीवर कारवाई करणार का, अशी विचारणा केली. त्यावर कामगार मंत्री सुरेश खाड्ये यांनी उत्तर देताना, त्या अन्नाच्या दर्जाची चौकशी करू, तसेच संबंधित आमदारावर कारवाई करायची का, यावर पक्षश्रेष्ठींना सांगून कारवाई करू, असे म्हटले. त्यामुळे सभागृहात हश्या पिकला.
( हेही वाचा : विधेयक मागे घ्या; अन्यथा दुसरा एकनाथ शिंदे तयार होण्यात अडचणी – अजित पवार)
उपसभापती यांनी दिली मिश्किल प्रतिक्रिया
त्यावर आमदार शिंदे यांनी उत्तरावर आक्षेप घेत, सभागृहात उत्तर देताना संबंधित आमदारावर कारवाई करताना पक्ष श्रेष्ठींना सांगून कारवाई केली जाईल, असे कसे उत्तर देवू शकता, असे सांगत जाणीव करून देण्यात आली. त्यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही असे उत्तर दिले का, मग योग्यच दिले अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
मंत्र्यांना आमदारांना केली सूचना
त्यानंतर मंत्री खाडये यांनी उत्तरात सुधारणा करत, नुकतेच आपल्याला दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आमदाराला मुख्यमंत्री यांनी सूचना केली आहे, असे सांगितले. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनी, संबंधित मंत्री हे आता पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री, पक्षाचे चिन्ह यातून बाहेर यावे आणि मंत्री म्हणून उत्तर द्यावे असे सांगत मंत्री खाड्ये यांची खिल्ली उडवली.
काही दिवसापूर्वी आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्न योजनेंतर्गत कामगारांना निकृष्ट जेवणाचे डबे देत असल्यामुळे कंत्राटदाराला मारहाण केली होती, त्यामुळे आमदार बांगर अडचणीत आले होते.
Join Our WhatsApp Community