राज्यातील शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष करून राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रम शाळा आणि वसतिगृह येथे अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. त्यासाठी तेथेे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार का?, असा प्रश्न भोर (जिल्हा पुणे) येथील आमदार संग्राम थोपटे यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांमधील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी येत्या वर्षभरात टप्प्याटप्याने सीसीटीव्ही कॅमेरे वरील तिन्ही ठिकाणी बसवण्यात येतील, असे घोषित केले.
कॅमेरे फक्त खासगी शाळांमध्येच बसवण्यात येणार
आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, सीसीटीव्ही कॅमेरे फक्त खासगी शाळांमध्ये का? २ दिवसांपूर्वी पुणे येथील ११ वर्षीय विद्यार्थिनींवर शाळेतच लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असल्याची माहिती देऊन त्यानुसार विधानसभेत प्रश्नोत्तरात सर्व शाळांमध्ये असे प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील का?, तसेच हे कॅमेरे फक्त खासगी शाळांमध्येच बसवण्यात येणार आहेत का?, असाही प्रश्न उपस्थित केला.
(हेही वाचा बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरेंसह ‘या’ राजकीय नेत्यांची नावे)
विधानसभेत गोंधळ
त्यावर मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व्यवस्थापणाच्या शाळांमध्ये आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सूचना ७ एप्रिल २०१६ या दिवशी शासन परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. परंतु शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कधी बसवणार? याविषयी त्यांनी प्रथम उत्तर न दिल्याने सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. अखेर सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन वर्षा गायकवाड यांनी येत्या वर्षभरात टप्प्याटप्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा आणि वसतिगृह येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, असे सांगितले.
Join Our WhatsApp Community