शाळा सुरु करण्यावर मंत्र्यांमध्ये मतभेद! शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर आरोग्यमंत्र्यांचा आक्षेप!

राज्यातील शाळा सुरू करण्याचा पहिला निर्णय सोलापूरमध्ये घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ६७८ गावे कोरोनामुक्त झाले असून यातील ८३ जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारीपासून सुरु झाल्या.

जे गाव कोरोनामुक्त होईल त्या गावातील शाळा सुरु करण्यात याव्यात, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. त्याप्रमाणे याची सुरुवात सोमवार, १२ जुलैपासून सोलापूर जिल्ह्यामधून झाली, मात्र याला स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता शाळा सुरु करण्यावरून महाविकास आघाडीतील मंत्र्यांमधील मतभेद समोर आले आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या विरोधामुळे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.

काय म्हणाले आरोग्यमंत्री?

सध्या जोवर लसीकरण पूर्ण होत नाही, तोवर शाळा सुरु करणे योग्य नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यावर आधी महाविद्यालये सुरु करण्यास काही हरकत नाही, मात्र आता शाळा सुरु करणे संयुक्तिक ठरणार नाही. शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण टप्प्याटप्याने झाल्यावरच शाळा सुरु कराव्यात, असेही टोपे म्हणाले. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्यामध्ये अधिक त्रास हा लहान मुलांना होणार आहे. अशा वेळी शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरणाशिवाय शाळा सुरु करणे धोक्याचे ठरणार आहे, असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

(हेही वाचा : आता गांधीगिरी नाही, तर आक्रमकता दाखवणार! नियम शिथिलतेसाठी व्यापारी संतप्त)

काय म्हटले आहे परिपत्रकात?

जे गाव कोरोनमुक्त होईल त्या गावातील इयत्ता ८वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात यावे, त्यासाठी गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, कमीत कमी एक महिना संबंधित गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून येता कामा नये. शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे. विद्यार्थ्यांना शाळेत टप्प्याटप्याने बोलवावे. एक बाकावर एकच विद्यार्थी बसावावा.

सोलापुरात ८३ शाळांच्या घंटा वाजल्या!

राज्यातील शाळा सुरू करण्याचा पहिला निर्णय सोलापूरमध्ये घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात १ हजार ०२४ पैकी ६७८ वे कोरोनामुक्त झाली आहेत. यातील ३३५ गावात शाळा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यातील ८३ जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारी सुरु झाल्या. काही दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या प्रशासनाच्या आढावा बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here