मराठा समाज यंदाच्या निवडणुकीत भाजपापासून दुरावला, हे स्वतः भाजपाच्या नेत्यांनीही मान्य केले. ‘विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही गोष्ट भाजपाला परवडणारी नाही. आता मराठा समाजाला पुन्हा जवळ आणण्यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद मिळेल’ असा सर्वांचाच कयास होता. २०१९ मध्येही पक्षबदल करतेवेळी त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण राजेंना थांबवून भाजपाने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पुढे केले. खुद्द मोहोळ यांनीही आपली मंत्रीपदी वर्णी लागेल याचा विचार केला नसावा. मात्र यामुळे आता राजेंसारख्या खासदाराला थांबवून अगदीच नवख्या, पहिल्यांदा निवडून आलेल्या मोहोळांवर भाजपाने डाव का खेळला ? देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमके यामागचे काय गणित आहे हे जाणून घेऊया… (Murlidhar Mohol)
पश्चिम महाराष्ट्रातून मराठा नेता म्हणून नावारूपाला आणण्याचा प्रयत्न
भाजपाच्या यंदा पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या दोन जागा निवडून आल्या. पहिले उदयनराजे भोसले आणि दुसरे मुरलीधर मोहोळ. सांगलीतून संजयकाका पाटील, माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरमधून राम सातपुते यांचा पराभव झाला. भाजपाने यंदा मंत्रीपदी वर्णी लावताना निवडक अपवाद वगळता लोकांमधून निवडून आलेले खासदार असा नियम लावला. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि मुरलीधर मोहोळ असे दोनच पर्याय होते. दोघेही मराठा असल्याने दोघांपैकी कोण, यात मुरलीधर मोहोळ यांनी सरशी मारली. भाजपा आता मुरलीधर मोहोळ यांना ताकद देऊन नवीन मराठा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करु शकते. (Murlidhar Mohol)
पुणे, पिंपरी चिंचवड तसेच पुणे ग्रामीणमध्ये भाजपा वाढवणे
उदयनराजेही मराठा चेहरा असताना मोहोळच का ? तर याचे उत्तर आहे पुणे शहर आणि पुणे ग्रामीण. पुण्यात गत दोन्ही टर्मला भाजपाचे लीड साडे तीन लाखांच्या घरात होते. यंदाही भाजपाने विजय मिळवला असला तरीही हे लीड अवघ्या एका लाखावर आले आहे. आधी कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचा विजय, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत कमी झालेले लीड हा भाजपासाठी चिंतेचा विषय होता. याशिवाय पुणे जिल्ह्यात विधानसभेचे तब्बल २१ मतदारसंघ येतात. आगामी चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडसारखी महापालिका आहे, सर्वात मोठी जिल्हा परिषद आहे. याच्याही निवडणुका आगामी काही दिवसांमध्ये होणार आहेत. या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून भाजपाने साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांच्याऐवजी पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी भाजपाचे आमदार वाढवून भाजपा वाढवण्याचा प्रयत्न मोहोळ करतील. (Murlidhar Mohol)
(हेही वाचा – Chandrababu Naidu चौथ्यांदा होणार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, शपथविधी कार्यक्रमात मोदींसह कोण सहभागी होणार? जाणून घ्या…)
पश्चिम महाराष्ट्रातील पोकळी भरून काढणे
मोहोळ यांची मंत्रीपदी वर्णीचे तिसरे कारण म्हणजे, भाजपाकडे पश्चिम महाराष्ट्रात मास बेस लीडर नाही. कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील, सांगलीमध्ये संजयकाका पाटील, सुरेश खाडे, साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले, अतुल भोसले, सोलापूरमध्ये विजय देशमुख, सुभाष देशमुख असे चेहरे भाजपाकडे आहेत. पण हे चेहरे त्या-त्या जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले. पुण्यात गिरीश बापट यांच्यानंतर मोठी पोकळीच तयार झाली. हीच पोकळी भरून काढण्यासाठी मोहोळ यांना भाजपाकडून ताकद दिली जाणार आहे. (Murlidhar Mohol)
अजित पवार यांना शह देण्यासाठी…
पुण्यात गिरीश बापट यांच्यानंतर भाजपाकडे बडा नेता नाही. बापट यांच्या जागी भाजपाने कोल्हापूरमधून चंद्रकांत पाटील यांना पुण्यात आणले, निवडून आणले. पण पुण्याचे नेते म्हणून ते तयार होऊ शकले नाहीत. त्यामुळे अजित पवार यांना काऊंटर करु शकेल असा चेहरा भाजपाला अत्यावश्यक होता. जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ पैकी निम्म्या जागांवर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दोन खासदार आहेत. दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषदेतही अजितदादांची चांगली ताकद आहे. आजच्या घडीला अजित पवारांच्या राजकारणाची रेष मोहोळांपेक्षा कितीतरी पटीने निश्चितच मोठी आहे. पण भाजपाला कधी ना कधी ही रेष मारायला घ्यावी लागणार होती, हीच सुरुवात मोहोळांच्या रुपाने केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Murlidhar Mohol)
केंद्रात आपला विश्वासू असावा
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा चेहरे आहेत. यात नितीन गडकरी आणि पीयूष गोयल हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वरिष्ठ आहेत. रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे हे मंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील किंवा विश्वासातील नाहीत. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्यारुपाने देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आपला एक विश्वासू चेहरा उतरवल्याचे दिसून येते. दिल्लीतील राजकारणावर मोहोळ यांच्या माध्यमातून फडणवीस हे दिल्लीतील राजकारणावर लक्ष ठेवून राहू शकतील हे निश्चित. (Murlidhar Mohol)
या सर्व गोष्टी लक्षात घेता उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद देऊन फक्त आणि फक्त मराठा खुश करता आले असते. परंतु इतर या कारणांसाठी मोहोळ हे कधीही उदयन महाराजांपेक्षा उजवे ठरले. यामुळेच मोहोळ यांना मंत्रिपदी वर्णी लावून फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्ष मारले आहेत. (Murlidhar Mohol)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community