मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बोलतीच बंद! काय आहे कारण? वाचा…

काही अधिकाऱ्यांमुळे आधीच रडारवर असलेला अधिकारी वर्ग पत्रकारांना देखील कोणतीच माहिती देत नाही.

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब तसेच रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन सध्या ठाकरे सरकार विरुद्ध अधिकारी वर्ग असा वाद रंगला आहे. त्यातच परबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांविरोधात न्यायालयात देखील धाव घेतली आहे. याचमुळे आता हा वाद आणखी चिघळला आहे. राज्यातील सध्या सुरू असलेल्या या वादावरुन मंत्रालयातील इतर अधिकारी वर्ग देखील धास्तावला असून, सध्या या अधिकाऱ्यांची बोलती बंद झालेली आहे. काही अधिकाऱ्यांमुळे आधीच रडारवर असलेला अधिकारी वर्ग पत्रकारांना देखील कोणतीच माहिती देत नाही.

(हेही वाचाः रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार? सरकारची तयारी सुरू!)

मंत्रालयात खाजगी बोलणे नको रे बाबा…

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधीशी खासगीत बोलताना, सध्याचे वातावरण पाहिले तर मंत्रालयात कुणासोबत खासगीत न बोललेच बरे, असे म्हणत बोलणे टाळले. आधीच मंत्रालयातील काही अधिकारी हे मंत्रालयातील इत्तंभूत माहिती हे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोहोचवत असल्याची चर्चा होती. त्यात आता परमबीर सिंग आणि रश्मी शुल्का यांच्या फोन टॅपिंग प्रकरणानंतर इतर अधिकाऱ्यांकडेही बघण्याचा दृष्टीकोन महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा बदलल्याचे एका अधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीदरम्यान सचिन वाझे, परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांच्याबाबत चर्चा झाली. मात्र या चर्चेदरम्यान काही अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितल्याचे या वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्थान पोस्टशी खासगीत बोलताना सांगितले. विशेष म्हणजे कॅबिनेट बैठकीदरम्यान सार्वजनिक बाधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जर मंत्र्यांचे फोन टॅप होत असतील तर काम कसे करायचे, ही बाब गंभीर असल्याचे म्हणत याविषयावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

(हेही वाचाः ठाकरे सरकारची अधिका-यांनी उडवली झोप! कॅबिनेटमध्येही गाजला मुद्दा)

आता तो कर्मचारी वर्ग बदलणार का?

फडणवीस सरकारच्या काळातील मंत्र्यांकडे असलेला कर्मचारी वर्ग आजही महाविकास आघाडीच्या काही मंत्र्याकडे कार्यरत आहे. त्यामुळे आता हा कर्मचारी वर्ग बदलायचा की तोच कायम ठेवायचा, असा विचार देखील महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांचे असे म्हणणे आहे की, हा कर्मचारी वर्ग दूर करण्यातच महाविकास आघाडीचे भले आहे. एवढेच नाही तर संघाशी जवळीक असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील आता ठाकरे सरकार विशेष लक्ष ठेवणार आहे. याचमुळे आता मंत्रालयातील अधिकारी धास्तावल्याचे चित्र आहे.

(हेही वाचाः कोरोना गंभीर, पण राजकारणी राजकारणात खंबीर!)

आधीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री अधिकाऱ्यांवर नाराज

ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी फडणवीस सरकारच्या काळात जे अधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ होते त्यांना दूर ठेवावे असे सुचवले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी देखील फडणवीस सरकारच्या काळात काम केलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या सोबत घेतले. माजी मुख्य सचिव आणि सध्याचे महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता हे याचाच एक भाग होते. अजोय मेहतांची मुख्यमंत्र्यांनी प्रधान सल्लागार म्हणून देखील नियुक्ती केली होती. यावर काही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्यावेळी नाराजी देखील व्यक्त केली होती. मात्र आता परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांच्यामुळेच ठाकरे सरकार अडचणीत आले असून, इतर अधिकारी देखील सध्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः सरकार अधिकाऱ्यांना ओळखण्यात अपयशी ठरले! आव्हाडांचा घरचा आहेर )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here