नदीच्या विकासाची गंगा मैलीच!

महापालिकेने दहिसर नदीवर १२५ कोटींहून अधिक, पोयसर नदीवर सुमारे २०० कोटी आणि ओशिवरा-वालभट नदीवर सुमारे ८५ कोटी याप्रमाणे सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

117

२६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीबरोबरच दहिसर नदी, पोयसर नदी, वालभट नदी आणि ओशिवरा नद्यांचाही ‘मिठी’च्या धर्तीवर विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु आजवर या नद्यांचे रुंदीकरणच झाले नसून प्रत्यक्षात या मिठीप्रमाणेच त्यांची अवस्था झाली आहे. सुरुवातीच्या काळात रुंदीकरण आणि भिंत उभारण्यावर सुमारे ४०० कोटी रुपये खर्च केल्यानंतर अजूनही सुमारे १४०० कोटी रुपयांचा खर्च नाल्याचे रुपांतर नदीत करण्यासाठी केला जात आहे. परंतु मागील १३ वर्षांमध्ये नदीच्या रुंदीकरणाशिवाय याचे रुपडं पालटले गेलेले नाही. त्यामुळे महापुराच्या भीतीने केवळ कोट्यवधींचा पैसा रिता केला तरीही नदींच्या विकासाची गंगा पुढे सरकरली नाही. उलट ती मैलीच राहिली आहे.

इतर नद्यांकडे दुर्लक्ष 

२६ जुलैच्या महापुरानंतर मिठी नदीचा विकास हा मिठी नदी प्राधिकरण बनवून स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २००८मध्ये दहिसर, पोयसर, वालभट-ओशिवरा नद्यांचा एकत्र विकास करण्याचा निर्णय घेत काम हाती घेण्यात आला.  परंतु या सर्व नदींच्या पात्रांचे रुंदीकरणासह  संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार आता दहिसर नदीचे पाणी शुध्द करण्यासाठी तसेच त्यातील मल मिश्रित पाणी रोखण्यासाठी मलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण इतर नद्यांकडे तर पुरती पाठच प्रशासनाने फिरवली आहे. आतापर्यंत या तिन्ही नद्यांपैकी दहिसर नदीवर १२५ कोटींहून अधिक, पोयसर नदीवर सुमारे २०० कोटी आणि ओशिवरा-वालभट नदीवर सुमारे ८५ कोटी याप्रमाणे सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

(हेही वाचा : मुंबईची ‘मिठी’ काही सुटेना!)

नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम ४-५ वर्षे होणार नाही 

मागील अनेक वर्षांपासून संरक्षक  भिंतीचे काम पूर्ण होवूनही यात सोडले जाणारी मलमिश्रित पाणी रोखण्यात महापालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे या सर्व नद्यांना त्यांच्या मुळ रुपात आणण्यासाठी नदी पुनरुज्जीविकरणाचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेत यासाठी सल्लागारांची नेमणूक केली आहे. यामध्ये पाण्याची भुजल पातळी वाढवण्यापासून मलवाहिनी टाकण्यापर्यंतची सर्व कामे केली जाणार आहे. परंतु अद्यापही ते सल्लागारावरच अडकले आहे. सल्लागारांचा अहवाल काही आलेला नाही आणि महापालिकेने यासाठीचे काम काही हाती घेतले नाही. त्यामुळे पुढील चार-पाच वर्षांत तरी हे काम झालेले दिसणार नाही.

आतापर्यंत नद्यांवर झालेला खर्च

  • दहिसर नदी : १२५ कोटी रुपयांहून अधिक
  • पोयसर नदी : सुमारे २०० कोटी रुपये
  • ओशिवरा आणि वालभट नदी : ८५ कोटी रुपये

 भविष्यात होणारा खर्च : सुमारे १४०० कोटी रुपये

  • पोयसर नदी : ७५१ कोटी ६९ लाख रुपये
  • दहिसर नदी : १८० कोटी ९८ लाख रुपये
  • ओशिवरा-वालभट नदी :  ५०३ कोटी ४२ लाख रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.