मुंबईची ‘मिठी’ काही सुटेना!

मिठी नदीच्या विकासावर आतापर्यंत १ हजार १५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर उर्वरीत कामांसाठी ९८० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. याशिवाय वार्षिक मिठी नदीची साफसफाई आदी कामांवर चार हजार कोटींपेक्षा अधिक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

164

मुंबईतील ‘२६जुलै’च्या महाप्रलयामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या विकासाचे काम हाती घेवून १६ वर्षे उलटत आले, तरी मुंबईची पुराची मिठी काही सुटलेली नाही. ‘२६ जुलै’च्या महापुरानंतर आजवर या मिठीच्या विकासावर सफाईसह कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु मिठी नदीचा कायापालट काही झालेला नाही. उलट आता मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढून ओहोटीच्या वेळीही आसपासचा परिसर जलमय होत आहे. तरीही मिठी नदीवरील कुर्ल्यातील झोपड्यांचा अतिक्रमणाचा विळखा काही सुटलेला नाही. तसेच मिठीचा समुद्रात होणाऱ्या विसर्गाच्याठिकाणी असलेल्या अरुंद मार्गामुळे पाण्याचा प्रवाह अद्यापही रोखला जात नाही. त्यामुळे मिठीची मुंबईतील पुराची पकड अधिक मजबूत होताना दिसत आहे.

१६ वर्षे मिठीचे पुनर्रुज्जीवन झाले नाही! 

‘२६ जुलै’च्या महापुरानंतर प्रथमच आपल्याला मिठी नदीचे महत्व लक्षात आले. एकेकाळी गोड्या पाण्याची नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मिठी नदीचा भाग बुजवून त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे नदीला नाल्याचे स्वरुप आले होते. परंतु महापुरानंतर या मिठी नदीसह सर्वच नद्यांचे रुंदीकरण व त्यांची खोली वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हापासून म्हणजे २००६पासून मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या कामाला तसेच दोन्ही बाजुला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु मिठी नदीसह इतर नद्यांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होत आले तरी नाल्यातील मलनि:सारण वाहिन्या आणि सांडपाणी सोडण्याची ठिकाणे कायमच आहे. त्यामुळे या नद्यांचे पुनर्रुज्जीवन १६ वर्षे होत आली तरी झालेले नाही. प्रशासनाची मानसिकता असली तरी नदीच्या पात्रातील झोपड्यांचे पुनर्वसन हाच प्रमुख मुद्दा असून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केला जाणारा विरोध व अडवणुकीची भूमिका यामुळेच मिठीसह इतर नद्यांची मगर मिठी काही सुटलेली पहायला मिळत नाही. मिठी नदीचे रुंदीकरण झाल्यानंतर त्या शेजारी मलवाहिन्या टाकून त्यातील प्रदूषित पाणी रोखण्याबरोबरच यातील प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला. नदीच्या मुखाशी म्हणजे पवईला हा प्रयोग केला जात असला तरी पुढे मात्र त्यात प्रदुषितच पाणी येत असल्याने त्या शुध्दीकरण प्रकल्पाची काहीच किंमत नाही.

(हेही वाचा : रेल्वेचा महापालिकेवर विश्वास)

मिठीसाठी आतापर्यंत १ हजार १५६ कोटी रुपये खर्च!

मिठी नदीच्या विकासावर आतापर्यंत १ हजार १५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर उर्वरीत कामांसाठी ९८० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. याशिवाय वार्षिक मिठी नदीची साफसफाई आदी कामांवर चार हजार कोटींपेक्षा अधिक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मिठी नदीचे रुंदीकरण झाले असले तरी  पाण्याचा प्रवाह जलदगतीने होत आहे. त्यातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातून मिठी नदी खाडीवाटे समुद्राला मिळते. त्या खाडी व समुद्र परिसरातील मिठीचे मुख हे अरुंद असल्याने पाण्याचा प्रवाहाची गती संथ होवून पाणी मागे फिरले जाते. परिणामी आहोटीच्या प्रसंगीही पाणी तुंबले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोट्यवधी रुपये खर्च करूनही कुर्ला व आसपासच्या परिसरातील लोकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.

प्रति महिना १० लाख रुपयांचा दंड

मुंबई महापालिकेतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला २ जानेवारी २०२० रोजी मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्पच्या अंतर्भूत कामांची सद्यस्थिती व कालबध्द कृती आराखडा सादर करण्यात आला होता. या आराखड्याचे पालन न केल्यास महापालिकेला १ एप्रिलपासून १० लाख रुपये प्रति महिना दंड आकारण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे मिठी अजूनही प्रदूषित राहिल्याने मुंबई महापालिकेचे कोट्यवधी पाण्यात गेले असून पर्यावरणाचा विचार करता हे मुंबईचे मोठे नुकसान होत आहे.

मिठी नदीच्या विकास हा १६ वर्षांपासून कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात नाही. आजही कुर्ला परिसरात २००५ सालाप्रमाणेच परिस्थिती आहे. आजही मिठी नदीमुळे कुर्ला परिसर पाण्याखाली जात आहे. मिठीवरील आजवर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात वाहून गेला आहे. शिवाय मिठीतील गाळाची सफाई होतही नाही. केवळ कागदावर सफाई दाखवून दरवर्षी कोट्यवधी रुपये लाटले जात आहे.
– कप्तान मलिक, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस.

मिठी नदीची आतापर्यंत झालेली कामे व त्यावरील खर्च

  • १६.२ कि.मीचे लांबीचे ७ फुटांपर्यंत खोलीकरणाचे काम पूर्ण: ३३० कोटी रुपये
  • १६.२ किलोमीटर लांबी व रुंदीकरणाचे काम पूर्ण : १७३ कोटी रुपये
  • संरक्षक भिंतीचे कामांवर झालेला खर्च : ५६९ कोटी रुपये
  • मागील पाच वर्षांत नदीच्या पात्रातून हटवण्यात आलेल्या झोपड्या : ४ हजार ३८८
  • पूर्ण झालेल्या कामांवरील एकूण खर्च : ११५६.७५ कोटी रुपये
  • एमएमआरडीए व महापालिकेने आजवर केलेला मिठीवरील एकूण खर्च : १६५६.७५ कोटी रुपये

(हेही वाचा : महापालिकेच्या १३२ अभियंत्यांच्या पदोन्नतीचा वाद पेटणार)

सध्या सुरु असलेली मिठी नदीची कामे

  • उर्वरीत झोपडपट्ट्या हटवून त्यांचे पुनर्वसनाचा खर्च : १७५० कोटी रुपये
  • नदीच्या किनारी साडेसहा किमी अंतराचे रस्ते : ३० कोटी रुपये
  • साडेतीन कि.मीची मलजल वाहिनी टाकण्याचा खर्च : ३० कोटी रुपये
  • ११.१२ कि.मी मलजलवाहिनीची कामे :  सुमारे खर्च ९७.५ कोटी रुपये
  • प्रस्तावित कामाचा एकूण अंदाजित खर्च ९८०.१४ कोटी रुपये
  • आजवर झालेला व होणारा एकूण खर्च  : २१३६.८९ कोटी रुपये ( सफाई वगळता)
  • मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण व आर.सी.सी भिंत बांधून मलजलवाहिनी टाकणे तसेच नदीचा प्रवाह निश्चित करण्यावर होणारा खर्च: ४९० कोटी रुपये
  • मिठीच्या सफाईवरील यावर्षीचा खर्च : सुमारे ९० कोटी रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.