महाराष्ट्र बंद : दादर मार्केट सुरु, बेस्ट सेवा बंद!

महाराष्ट्र बंदचा सकाळी दादर मार्केटमध्ये काहीही परिणाम झाल्याचे दिसत नव्हते. या व्यतिरिक्त नागपूर, जळगाव, पुणे येथील बाजारपेठा सुरू होत्या. 

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील शेतकरी हल्ल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याने सोमवारी साहजिकच राज्य सरकारच्या अधिपत्याखालील कार्यालये आणि सेवा बंद असतील, अशी शक्यता आहे. त्याप्रमाणे सकाळपासून बेस्टच्या बहुतांश आगारातून एकही बेस्टची गाडी बाहेर पडली नाही, मात्र सकाळी दादर मार्केट सुरु असल्याचे चित्र होते. त्यामुळे या बंदला सरकारी आस्थापनांचा पाठिंबा असला तरी व्यापारी आणि खासगी आस्थापने किती सहकार्य करणार हा महत्वाचा प्रश्न आहे.

दादर मार्केट फुल्ल! 

सत्ताधारी पक्षाचा महाराष्ट्र बंद रविवारी रात्री १२ वाजल्यापासून सुरु झाला तरी दादर मार्केट मात्र दर दिवसाप्रमाणे सोमवारीही पहाटेपासून सुरु होते. नवी मुंबई, नाशिक येथून भाज्या आणि फुलांचे ट्रक मार्केटमध्ये दाखल झाले. तसेच मुंबई  आणि परिसरातील किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांनीही नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. त्यामुळे महाराष्ट्र बंदचा सकाळी दादर मार्केटमध्ये काहीही परिणाम झाल्याचे दिसत नव्हते. या व्यतिरिक्त नागपूर, जळगाव, पुणे येथील बाजारपेठा सुरू होत्या.

(हेही वाचा : वरुण गांधींप्रमाणे जे व्यक्त होऊ शकले नाहीत, त्यांच्याकरता ‘महाराष्ट्र बंद’!)

एपीएमसी मार्केट बंद! 

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मात्र कडकडीत बंद होते. याठिकाणी सर्व व्यवहार बंद होते. लिलाव बंद होते. तसेच या ठिकाणी घाऊक आणि किरकोळ व्यापारीही आले नव्हते.

बेस्ट बसगाड्या आगारातच! 

दरम्यान महापालिका आणि बेस्ट सेवेवर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने आज सकाळपासून मात्र बेस्टच्या बस गाड्या आगाराच्या बाहेर पडू शकल्या नाहीत. आजच्या बंदला शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेना आणि काँग्रेसच्या संघटनेनेही पाठिंबा दिला. त्यामुळे याचा फटका बेस्टच्या सेवेला बसला. सकाळपासून बहुतांश आगारातून बसगाड्या बाहेर पडल्या नसल्याने नोकरदार वर्गाची गैरसोय झाली. रेल्वे स्थानकांपर्यंत पोहचण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सींचा आधार घ्यावा लागला. असाच परिणाम राज्य परिवहन महामंडळावर झाल्याचा दिसला. एसटीच्या काहीच गाड्या रस्त्यावर होत्या. पुणे महापालिकेची सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद होती.

व्यापाऱ्यांवर जबरदस्ती चालू देणार नाही – नितेश राणे 

दरम्यान आजच्या बंदला व्यापारी वर्गाने पाठिंबा देण्यावरून संमिश्र प्रतिक्रिया दिला आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाचा किती पाठींबा असणार हे पहावे लागणार आहे. आधीच कोरोना काळात दुकाने बंद होती, त्यामुळे व्यावसायिक नुकसान झाले, आता पुन्हा बंदला पाठिंबा देऊन नुकसान सहन का करावे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी केला आहे. दरम्यान भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मात्र व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याची जबरदस्ती केली तर भाजपा शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here