भाजपने करून दिली महापालिका आयुक्तांना नालेसफाईची आठवण

154
गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या निविदा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे  साफसफाईच्या कामांना विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन याकडे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष. आमदार. ऍड. आशिष शेलार यांनी केली आहे.
आमदार ऍड आशिष शेलार यांनी आयुक्तांना पत्र लिहिले असून पत्रात त्यांनी म्हटले आहे की,
आपणास ज्ञात आहेच की,
पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मुंबईतील सुमारे ३०९ मोठे नाले, ५०८ छोटे नाले, ५ नद्या आणि रस्त्यालगतची छोटी गटारे यातील गाळ काढण्याची कामे करावी लागतात. साधारणतः मार्च महिन्याच्या अखेरीस अथवा एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली तरच ती कामे वेळेत पूर्ण होतात, असे आजपर्यंतच्या कार्यपध्दतीवरुन दिसून आले आहे.
मात्र, यावर्षी अद्याप नालेसफाईच्या कंत्राटाच्या निविदाच काढण्यात आलेल्या नाहीत. ही निविदा प्रक्रिया वेळीच पुर्ण न झाल्यास प्रत्यक्ष कामे वेळीच सुरु होणार नाहीत. गतवर्षी अशा प्रकारे निविदा प्रक्रिया उशिरा सुरु झाली होती त्यावेळी ही आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यानंतर विलंबाने प्रक्रिया सुरु झाली खरी मात्र त्याचा कामांवर परिणाम झाला होता.
गतवर्षीचा अनुभव लक्षात न घेता पुन्हा याही वर्षी प्रशासनाने निविदा प्रक्रियेला उशीर केल्याचे दिसून येते आहे, ही बाब गंभीर असून याकडे आपण तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरी आपण याबाबत तत्काळ लक्ष द्यावे, ही विनंती ऍड आशिष शेलार यांनी पत्रात केली आहे.

यामध्ये शेलार यांनी काही सूचना केल्या आहेत त्या अशा…

  • ज्या पध्दतीने छोट्या नाल्यांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्या आहेत तशाच मोठ्या नाल्यांच्या कामांच्या निविदा तातडीने काढण्यात याव्यात.
  • निविदा प्रक्रिया पारदर्शक असावी.
  • मागिल काळात काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांचा यामध्ये समावेश करण्यात येऊ नये.
  • निविदेपासून साफसफाईपर्यंत संपूर्ण कामांचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावेत.
  • कामे वेळेत सुरु व्हावीत, यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, गाळ संपूर्ण काढला जाईल या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.