बाळासाहेबांच्या पश्चात मराठीला उतरती कळा; भाजप आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

116

शिवसेनेचा रविवारी ५६वा वर्धापन दिन सोहळा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हाॅटेलच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाजपचे आमदार अमीत साटम यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मराठी भाषेला उतरती कळा लागल्याचे सांगत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

काय लिहिलंय पत्रात ?

सर्वप्रथम आपणास हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. पण बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या ‘मराठी’भाषेला आज उतरती कळा लागली आहे. खासकरून स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळं ठोकण्यात येत आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच दृष्टीकोनातून सत्ताधारी सेनेचा मराठी शाळांबाबत आहे का? असा सवाल त्यांनी पत्राद्वारे केला आहे.

( हेही वाचा: Shiv Sena: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमीत्त टीझर जारी )

मराठी शाळांची संख्या कमी होतेय

गेल्या वर्षी मी पत्र व्यवहार करुन आपले लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर न प्रतिक्रिया आली न कारवाई झाली. २०१२ – १३ मध्ये ३८५ मराठी शाळा होत्या. ८१ हजार १२६ विद्यार्थी होते. २०२१-२२ मध्ये शाळा फक्त २७२ उरल्यात आणि ३४,०१४ विद्यार्थ्यी तिथं शिक्षण घेतायेत. म्हणजेच गेल्या १० वर्षात ११० मराठी शाळांना टाळं लागलं आहे. ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याची माहिती समोर येतीये.. एकीकडे सत्ताधारी सेना मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगत आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घसरत आहे.

मी आशा करतो की तुम्ही मराठी शाळांच्या परिस्थितीची गंभीर दखल घ्याल जेणेकरून भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा “foundation day” म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.