आशिष शेलार लांब उडीत बाद

93

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा आमदार ऍड.आशिष शेलार यांची नियुक्ती करत मुंबई महापालिकेवरील भगवा फडकवण्याची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, शेलार यांची प्रदेशाध्यक्ष बनून राज्यभर आपल्या आपल्या नेतृत्वाची झलक दाखवण्याची प्रचंड इच्छा होती. या इच्छेमागे २०२४ मधील राज्याच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने लपली होती. परंतु शेलार यांना राज्यात नेतृत्व करण्याची इच्छा असली तरी पक्ष नेतृत्वाने त्यांना आपली जागा मुंबईत असल्याचे दाखवून देत मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे मुंबईच्या बाहेर लांब उडी मारायचा सराव करणाऱ्या शेलारांना प्रत्यक्ष स्पर्धेतूनच बाद व्हावे लागले. त्यामुळे आता त्यांना मुंबईतच आपली नेतृत्व कुशलता दाखवावी लागणार आहे.

( हेही वाचा : ‘सामना’ने बंडखोर आमदारांना नाकारले; पण एकनाथ शिंदेंना स्वीकारले )

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्षपदी असलेल्या मंगलप्रभात लोढा यांची वर्णी राज्य मंत्रीमंडळात लागल्यानंतर या दोन्ही अध्यक्षपदी पक्षाने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. प्रदेशाध्यक्षपदी रिक्त होणार असल्याने भाजप आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई बाहेर विविध जिल्ह्यांमध्ये भेटीगाठी देत आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कामाला सुरुवात केली होती. मुंबईतील कोणत्याही पदाधिकाऱ्याची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी केली जात नाही हा इतिहास असला तरी आपण तो बदलून प्रदेशाध्यक्ष बनू असा विश्वास शेलार यांना होता.परंतु पक्षनेतृत्वाने शेलार यांना लांब उडी मारण्यापूर्वीच पुन्हा एकदा मुंबईत ओढून घेत मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवत त्यांचा पत्ताच कापला. त्यामुळे शेलारांना लांब उडी मारण्यापूर्वीच त्यांचे पाय पुन्हा मुंबईतच अडकून पडले.

शेलारांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्ते खूश

शिवसेना आणि भाजपमध्ये मागील २०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून तुल्यबळ शाब्दिक युध्द झालेले असल्याने भाजपकडून तत्कालिन मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्याकडून ठोस प्रत्युत्तर दिले जात नव्हते. लोढा यांच्या मवाळ भूमिकेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलनात सक्रीय होऊन शिवसेनेला आव्हान देता येत नव्हते. तसेच लोढा हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेट नसल्याने तसेच मार्गदर्शन करत नसल्याने एकप्रकारे नैराश्य पसरले होते. परंतु शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी निवड होतात एकप्रकारचे चैतन्य भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पसरले आहे. सन २०१७च्या निवडणुकीत तत्कालिन मुंबई अध्यक्ष असलेल्या शेलार यांनी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करत आजवरच्या नगरसेवक संख्येच्या दुप्पट ते तिप्पट नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शेलार यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याने २०२४च्या निवडणुकीत शेलार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर निश्चितच भगवा फडकवला जाईल,असा विश्वास प्रत्येक भाजप पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी लोढा यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेतल्यानेही पदाधिकारी व कार्यकर्ते खूश असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.