भांडुप पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलाच्या बांधकामात अशीही श्रेयाची लढाई

144

आजवर नगरसेवकांच्या कामांचेही श्रेय घेणाऱ्या विक्रोळीतील शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी आता खासदारांच्या प्रयत्नातून होऊ घातलेल्या कामांवरही आपला हक्क दाखवून पुन्हा एकदा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. भांडुप पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या कामाच्या निविदा महापालिकेने काढल्यानंतर आमदारांनी आपल्या प्रयत्नानंतरच हे काम होत असल्याचा दावा सोशल मिडियाच्या माध्यमातून केला आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामाचा आराखड्याला रेल्वेची मंजुरी काही दिवसांपूर्वी मिळाली असून यासाठी लागणारी ६५०० चौरस मीटरची जागा खासगी व्यक्तीच्या मालकाकडून महापालिकेला देण्याची प्रक्रिया आणि मिठागर आयुक्तांची परवानगी याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी झाली आहे.

या तिन्ही प्रकारच्या प्रक्रियेसाठी केंद्राच्या स्तरावर स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी संबंधितांच्या भेटी घेऊन महापालिकेला या पुलाच्या निविदा निमंत्रित करण्यास भाग पाडले. त्यामुळे एका बाजुला कोटक हे जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन आपण हे काम केल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे आमदार हे आपल्या प्रयत्नातून या पुलाचे बांधकाम होत असल्याचे सांगत असल्याने नक्की या पुलासाठी प्रयत्न कुणाचे आणि श्रेय कोण घेण्याचा प्रयत्न करतेय याची चर्चा आता स्थानिक मतदारांमध्येच सुरु आहे.

भांडुप पूर्वेतील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ते भांडुप पश्चिमेतील लालबहादूर शास्त्री मार्गावर उतरणारे ५३० मीटर लांबीचे आणि ११ मीटर लांबीचे रेल्वे पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे.मात्र, रेल्वेवरून जाणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी या पुलाच्या बांधकामाचा आराखडा मध्य रेल्वेला सादर केला होता. या पुलाच्या बांधकाम आराखड्याला रेल्वेने मंजुरी दिली आहे. तर या पुलाच्या बांधकाम इतर खासगी जागेतून जात असूनही जमिन मिठागराच्या जागेतून जात आहे. त्यामुळे मिठागराच्या जागेतून जाणारी ६५०० चौरस मीटरची जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवणे महत्वाचे होते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून खासदार मनोज कोटक यांच्यावर भाजपने महापालिकेची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी खासगी मालकीची जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाची नोटीस बजावण्यासाठी महापालिकेची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जमिन मालकाने महापालिकेला जमिन देण्यास परवानगी दिली असून याबाबतची पुढील सर्व कागदोपत्री प्रक्रिया पुढील चार दिवसांमध्ये पार पाडली जाणार आहे. यासाठी मिठागर आयुक्तांचीही परवानगी खासदारांनी मिळवली. तसेच रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन रेल्वेकडूनही पुलाचे आराखडे मंजूर करुन घेण्यासाठीही पाठपुरावा केला. मागील अनेक महिन्यांपासून या कामाची गती जैसे थे असल्याने जुलै २०२१मध्ये कोटक यांनी यापूर्वीचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व त्यानंतरचे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनील शर्मा यांना निवेदन दिले होते.

कोटक यांनी मागील दोन महिन्यांमध्ये महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासोबत बैठका घेऊन या पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक मंजुरी मिळाल्याने निविदा निमंत्रित करण्यास भाग पाडले. परंतु या निविदा निमंत्रित केल्यानंतर विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल करत आजवर आपण केंद्रीय स्तरासह राज्य शासन आणि महापालिकेडे पाठपुरावा केल्याने या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत जनतेला आपले प्रेम असेच राहू असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे राऊत यांच्या समर्थकांनी यानंतर सोशल मिडियावरून २०१७-१८मध्ये एस विभागाच्या सहायक आयुक्त यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचे पुरावे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी पत्र देऊन बैठक घेतल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन या सर्व परवानगी मिळवल्या असा दावा केल्याने जनतेमध्ये हास्याचा विषय बनला आहे. ज्या प्रशासनाला माहुल पंपिंग स्टेशनकरता मिठागर आयुक्तांची परवानगी मिळवून जमिन संपादन करता आली नाही, त्यांना या पुलाच्या बांधकामासाठी ६५०० चौरस फुटाची खासगी जमिन संपादीत करण्यास मिठागर आयुक्त परवानगी देतील कसे असा प्रश्न आता रहिवाशांनाच पडला आहे. खासदारांनी वेळोवळी यासाठी केलेल्या प्रयत्नाशिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या पुलाच्या बांधकाम प्रक्रियेला गती देता आलेली आहे ही बाब आता भांडुपकर मान्य करू लागले असून आमदारांनी पुन्हा एकदा आयत्यावर कोयता मारण्याचा प्रयत्न केल्याने पुन्हा एकदा या पुलाच्या बांधकाच्या श्रेयात जनता कुणाला उचलून धरते आणि कुणाला पाडते हे येत्या काळा स्पष्ट होणार आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार जर राऊत यांनी प्रयत्न केल्याने या पुलाचे बांधकाम होत असेल तर ५० वर्षाँपासून या भागातील नगरसेवक,आमदार,खासदारांनी केलेले प्रयत्न कुठे गेले? विद्यमान खासदारांनी केलेले प्रयत्न कुठे गेले,असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.