जोपर्यंत राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतं नाही. याबाबतचा निकाल लागल्यावरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. आणि जर निकाल लागल्यावरही विस्तार झाला नाही तर २०२४ नंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं एकंदरीत चित्र आहे, असं शिंदे गटाचे आमदार आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले.
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘मंत्रीपदापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं, त्यात आम्ही खुश आणि अत्यंत आनंदी आहोत. मंत्रीपद भेटलं नाही तरी आम्ही सेवक म्हणून मंत्रालयाचं नक्कीच काम करू. कालच आमची दिव्यांग बांधवांसाठी बैठक झाली. चांगल्या प्रकारचा प्रस्ताव करून मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचा आम्ही निर्धार केला आहे.’
२०२४नंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याचं कारण कडूंनी काय सांगितलं?
पुढे बच्चू कडू म्हणाले की, ‘निकाला झाल्यानंतरही विस्तार झाला नाही, तर या सरकारची मुदत संपण्यासाठी एक वर्षाचा कालावधी राहिलेला आहे. त्यातलेही शेवटचे सहा महिने निवडणुकीच्या तयारीत जातात. मग याचा अर्थतरी काय आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार नाही केला, तरी २० मंत्री आमचे सक्षम आहेत. चांगले निर्णय सरकार घेतंय. त्याच्यामुळे उगाच विस्तार करून आमदारांची नाराजी ओढवून का घ्यायची. त्याच्यापेक्षा २०२४ मे जो जितेगा, वो मंत्री बनेगा.’
(हेही वाचा – महाराष्ट्र सत्तासंघर्ष: तीन तासांच्या युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून)
‘तसंच कुणाच्या नाराजीचा काही विषय नाही. कारण एकनाथ शिंदे गट आणि भाजप राजकीय दृष्ट्या मजबूत आहेत. त्यामुळे विस्तारामुळे कोणी बाहेर जाईल असं वाटतं नाही. उलट शिंदे गट आणि भाजपाकडे येण्याची जास्त शक्यता आहे,’ असं कडू म्हणाले.
Join Our WhatsApp Community