शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दमदाटी केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ, अशी माहिती निकालानंतर बच्चू कडूंनी दिली आहे.
नेमक प्रकरण काय?
माहितीनुसार, २०१७ सालचे हे प्रकरण आहे. ज्यावेळेस नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा होते. त्यावेळी बच्चू कडू अपंग आणि नागरिकांच्या विविध समस्या घेऊन आयुक्तांच्या दालनात गेले होते. पण यावेळी बच्चू कडू आणि आयुक्तांमध्ये बाचाबाची झाली. मग याचे रुपांतर आंदोलनात झाले. या आंदोलनाच्या वेळी बच्चू कडूंनी आयुक्तांवर धावू जाण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून ही केस नाशिकच्या जिल्हा न्यायालयात सुरू होती.
याप्रकरणी बुधवारी, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने भादंविचे कलम ३५३ अन्वये बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे, एक म्हणजे दमदाटी करणे आणि दुसरे म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणे. या दोन्ही प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा त्यांना एकाच वेळेस भोगावी लागणार आहे.
पोलिसांनी बच्चू कडूंना घेतले ताब्यात
दरम्यान नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालानंतर पोलिसांनी बच्चू कडूंना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडूंना न्यायालयात हजर केले असून जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
(हेही वाचा – भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यासह पत्नीवर गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community