नाल्यांची सफाई न झाल्याने कंत्राटदाराच्या माणसाला रस्त्यावर बसवून त्यांच्या अंगावर कचरा फेकणाऱ्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी महापालिका ‘एल’ विभागातील अभियंत्यालाच धक्काबुक्की केल्याची बाब समोर आली आहे. शनिवारी झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर महापालिका ‘एल’ विभागातील अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. आमदार लांडे यांनी ही धक्काबुक्की एल विभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या दालनात केलेली असून त्यांच्याकडून अभियंत्यांची बाजु घेण्यात न आल्याने या विभागात काम करण्याची मनस्थिती आता कोणत्याही अभियंत्यांनी राहिलेली नसून आपले काम करताना खच्चीकरण होत असल्याच्या तक्रारीचे स्वाक्षरीसह निवेदनच येथील सर्व अभियंत्यांची महापालिका परिमंडळ ५चे उपायुक्त यांना दिले आहे. त्यामुळे सत्ताधार पक्षाकडूनच अशाप्रकारे शिवीगाळ करत धक्काबुक्की होत असल्याने आम्ही काम करायचे कसे, असा सवाल अभियंत्यांकडून केला जात आहे.
अभियंत्यांनी अशा प्रकारे काही तरी निवेदन दिल्याची माहिती मला उशिरा बाहेरुन कळाली आहे. परंतु ते निवेदन आपल्याला प्राप्त झालेले नाही. प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
– विश्वास शंकरवार, परिमंडळ पाचचे उपायुक्त
साहाय्यक आयुक्तांनी ‘त्या’ आमदाराला घातले पाठिशी
कुर्ल्यातील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयामध्ये शनिवारी हा प्रकार घडला आहे. एल विभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या दालनामध्ये आयोजित बैठकीत स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सहायक अभियंता किरणकुमार अन्नमवार अपशब्द वापरले. हा प्रकार घडत असताना ‘एल’ विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी आमदारांना कोणत्याही प्रकारची समज दिली नाही व आमदारांच्या असंविधानिक वर्तणुकीस मुक संमतीच दर्शवली असल्याचे निदर्शनास येते, असेही या निवेदनात त्यांनी नमुद केले आहे. एकप्रकारे साहाय्यक आयुक्तांनी किरणकुमार अन्नमवार यांची पाठराखण करणे जरुरीचे असताना त्यांनी आमदारांनाच पाठिशी घातले असल्याचेही या अभियंत्यांचे म्हणणे आहे. साहाय्यक आयुक्त यांच्या या वागणुकीमुळे आम्हा इमारत व कारखाने विभागातील मानसिक धक्का बसला असून मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे आता या ‘एल’ विभाग कार्यालयात काम करावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आहोत. त्यामुळे आम्हाला याप्रकरणी न्याय द्यावा, अशी याचना ‘एल’ विभागील अभियंत्यांनी परिमंडळ पाचच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली असून यावर सर्व अभियंत्यांनी स्वाक्षरीही केल्या आहे. याबाबतच्या निवेदनाची प्रत अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर), उपायुक्त(अतिक्रमण आणि निष्कासन) यांना सादर केले आहे.
अभियंत्यांची चौकशी लावण्याचे निर्देश दिले!
दरम्यान गुरुवारी याबाबत साहाय्यक आयुक्तांना भेटण्यास गेलेल्या कार्यकारी अभियंता यांना राजीनामा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. परंतु त्यानंतर राजीनामा पत्र घेवून गेलेल्या संबंधित कार्यकारी अभियंता यांचे ते पत्र साहाय्यक आयुक्तांनी फाडून टाकत त्यांना इतर अभियंत्यांची चौकशी लावण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे साहाय्यक आयुक्त अभियंत्यांच्या पाठिशी उभे राहण्याऐवजी लोकप्रतिनिधींच्या निर्देशानुसार काम करत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा काही प्रकार घडलाच नसल्याचे सांगत आपल्याला बदनाम करण्यासाठी कुणीतरी हा प्रकार करत असेल तर माहित नाही,असे म्हटले आहे. तर एल विभागाचा अतिरिक्त कारभार असलेल्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
Join Our WhatsApp Community