आज लोकशाहीचा पुन्हा एकदा विजय झाला. २०१९मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राज्यातील लाखो मतदारांचा आज विजय झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन निघालेल्या शिवसैनिकाचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आजचा विजय हा सत्याचा विजय आहे…. सत्यमेव जयते…, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आजचा निकाल हा कुणा एका पक्षाचा विजय नसून, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीमध्ये नेहमी बहुमताला महत्त्व असते. शिवसेना हा मूळ पक्ष अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिला आहे आणि धनुष्यबाणही आमच्याकडे दिले आहे. निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती ते लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही , हे या निकालाने अधोरेखित केले आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
(हेही वाचा NCP : शिवसेना निकालामुळे अजित पवारांचा मार्ग सुकर?)
अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचे भान देणारा हा निकाल आहे. मतदारांच्या मताचा सन्मान करणारा आणि लोकशाहीत त्याचा निर्णयाधिकार अबाधित ठेवणारा हा निकाल आहे, असे मी मानतो. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करू, अनैसर्गिक आघाड्या करून आणि विश्वास पायदळी तुडवून त्यावर ताठ मानेने उभे राहण्याचा घोर अपराध करणाऱ्या नेत्यांना या निकालाने धडा दिला आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community