- सुजित महामुलकर
बुधवार, १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष (Assembly speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रता (MLA disqualification) याचिकांवर ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर उबाठा गटाचे आमदार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) नियंत्रणाखाली येणार आहेत. नार्वेकर यांनी निकाल देताना शिवसेना हा पक्ष शिंदे यांचाच असल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच भरत गोगावले हे आता शिवसेना विधिमंडळ पक्षाचे अधिकृत प्रतोद असल्याने त्यांचा ‘व्हिप’ (Whip) हा शिवसेनेच्या सर्वच आमदारांना लागू असणार आहे. या व्हिपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचे अधिकारही यामुळे गोगावले यांच्याकडेच राहतील, असे तज्ञांकडून सांगण्यात आले.
दोन गट असण्याचा प्रश्नच नाही
विधिमंडळ सचिव पदाचा अनेक वर्षे अनुभव असलेले निवृत्त अधिकारी अनंत कळसे (Anant Kalse) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर आता दोन गट असण्याचा प्रश्नच राहत नाही. गोगावले (Bharat Gogawale) यांचाच व्हिप दोन्ही गटांना लागू असेल आणि तो त्यांना बंधनकारक असेल.”
(हेही वाचा MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांचा अवमान संजय राऊत, आदित्य ठाकरेंना भोवणार)
SC स्थगिती दिली तरच उबाठाला दिलासा
‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना कळसे पुढे म्हणाले, “अध्यक्षांच्या निकालाला उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्याला स्थगिती दिली गेली तरच उबाठा गटाला दिलासा मिळेल, अन्यथा शिंदे यांच्या शिवसेनेचा (Shivsena) व्हिप अधिकृत मानला जाईल.”
पुढील महिन्यात अधिवेशन
याचा अर्थ पुढील महिन्यात (फेब्रुवारी) शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात गोगावले यांचा व्हिप आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, अजय चौधरींपासून उबाठाच्या सर्व आमदारांना लागू असेल, यालाही कळसे यांनी दुजोरा दिला.
ठाकरेंवरही निलंबनाची कारवाई होऊ शकते
आदित्य ठाकरे यांनी जर गोगावले यांचा व्हिप मानला नाही किंवा त्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावरही निलंबनाची ही कारवाई होऊ शकते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यामुळे उबाठावर आता शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नियंत्रण राहील, हे स्पष्ट झाले.
Join Our WhatsApp Community