सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर (MLA disqualification case) सुनावणी सुरु आहे, त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे वकील एकमेकांवर वैयक्तिक टीका करत होते, त्यामुळे अध्यक्ष नार्वेकर नाराज झाल्याचे समजते. व्यक्तिगत टीका करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे म्हणत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यातील वैयक्तिक टीकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ
MLA disqualification case च्या सुनावणी वेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचे समजते. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी उपस्थित होते, तर ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामात युक्तिवाद करत होते. कागदपत्रे सादर करण्यासाठी शिंदे गटाने मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर, ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचे वाचन केले. या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रे ठाकरे गटाने सादर केली.
युक्तीवाद रेकॉर्डिंग करण्याची मागणी फेटाळली
दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली.
Join Our WhatsApp Community