MLA Disqualification Case : शिंदे यांना पदावरून हटविण्यासाठी ३० जूनपर्यंत वाट का पाहिली?; जेठमलानी यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती

दोघांनी ही जेठमलानी यांचा युक्तिवाद फेटाळून लावताना पक्षविरोधी कृत्य होऊ नये म्हणूनच विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षादेश काढल्याचे नमूद केले.

318
MLA Disqualification Case : शिंदे यांना पदावरून हटविण्यासाठी ३० जूनपर्यंत वाट का पाहिली?; जेठमलानी यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती
MLA Disqualification Case : शिंदे यांना पदावरून हटविण्यासाठी ३० जूनपर्यंत वाट का पाहिली?; जेठमलानी यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती

एकनाथ शिंदे यांच्यासह १५ आमदारांना अपात्र करण्याची याचिका २४ जूनला दाखल करण्यात आली. मात्र, शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ३० जून पर्यंत वाट का पाहिली? अशा प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेचे (शिंदे) वकील महेश जेठमलानी प्रतोद सुनील प्रभू यांची कोंडी केली. तर व्हीप पाठवल्याच्या मुद्द्यावर कार्यालयीन सचिव विजय जोशी यांना गोत्यात आणायचा प्रयत्न केला. दोघांनी ही जेठमलानी यांचा युक्तिवाद फेटाळून लावताना पक्षविरोधी कृत्य होऊ नये म्हणूनच विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षादेश काढल्याचे नमूद केले. जेठमलानी यांनी समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. (MLA Disqualification Case)

सोळा आमदारांच्या अपात्रतेवर विधानभवनात सलग आठव्या दिवशी सुनावणी पार पडली. पक्षप्रमुखपद आणि व्हीप यावर जेठमलानी यांच्याकडून प्रश्नांचा भडिमार केला. शनिवारी प्रतोद सुनील प्रभू आणि कार्यालयीन सचिव विजय जोशी यांची उलटतपासणी घेण्यात आली. सुनावणी आता पूर्ण झाली आहे. ७ जुलैपासून शिवसेनेच्या (शिंदे) ६-७ आमदारांची उलटतपासणी शिवसेनेचे (ठाकरे) वकील देवदत्त कामत यांच्याकडून होणार आहे. सुनावणीवेळी जेठमलानी यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावरून हटविण्याबाबत सुनील प्रभू यांना प्रश्न विचारला. मात्र सुनील प्रभू यांनी आपल्याला आठवत नसल्याचे सांगत यावर उत्तर देणे टाळले. एकनाथ शिंदे व इतर आमदारांना पक्षातील पदावरून पक्षविरोधी कृत्य करत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी काढत असल्याचे निवडणूक आयोगाला कळवले, हे पक्षादेशानुसार शक्य नसल्याचे जेठमलानी म्हणाले. तसेच अनिल देसाई यांच्याकडूनही निवडणूक आयोगाला १ जुलै रोजी शिंदे यांना ३० जून २०२२ रोजी पदावरून हटविण्यात आल्याचे सांगण्यात आले, असा दावा जेठमलानी यांनी केला. यावर प्रभू यांनी त्यांचे हे दावे फेटाळून लावले. (MLA Disqualification Case)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येते का; काय म्हणाले सुनील प्रभु)

हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह

शिवसेना पक्षाच्या विचारधारेत हिंदुत्वाचा समावेश होता का असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर हो नक्की आहे असे उत्तर प्रभूंनी दिले. बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट नावाने ओळखले जाते, हे माहित आहे का, या प्रश्नावर हे सर्व जगाला माहीत असल्याचे प्रभू म्हणाले. शिवसेना राजकीय पक्ष किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांनी हिंदुत्वाची भूमिका मवाळ घेण्याचा निर्णय घेतला होता का, असा प्रश्न जेठमलानी यांनी केला. प्रभु यांनी हे सर्व धादांत खोटे असल्याचे सांगत शिवसेना (ठाकरे) कधीही हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब जाऊ शकत नाही, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. त्यावर शिवसेना (ठाकरे) हा राजकिय पक्ष नसून राजकिय नेत्यांचा समूह असल्याचे जेठमलांनींनी सांगत प्रभू यांची कोंडी करायचा प्रयत्न केला. मात्र, तो ही त्यांनी फेटाळून लावला. (MLA Disqualification Case)

विधिमंडळ डायरीतील शिंदेंचा ईमेल सादर

एकनाथ शिंदे यांना ज्या मेलवरून पक्षादेश पाठवला तो मेलच खोटा असल्याचा दावा जेठमलानी यांच्याकडून करण्यात येत होता. अखेर सुनावणी सुरू होतानाच विधिमंडळाची डायरी सादर करीत या डायरीत नमूद असलेला ईमेल आणि ज्यावरून पक्षादेश पाठवला तो मेल एकच असल्याचे शिवसेनेने (ठाकरे) स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेच्या (ठाकरे) वकिलांकडून या ईमेलसंदर्भात ज्यांनी (एकनाथ शिंदे) यांनी तक्रार केली त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची हिंमत का दाखवली नाही, असा सवाल देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आला. (MLA Disqualification Case)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : अनिल देसाई यांनी पाठवलेले पत्र रेकॉर्डवर आणा; ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र)

४ जुलै २०२२ चा व्हीप

सरकार स्थापनेनंतर ४ जुलै रोजी झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी सरकारविरोधी मतदान करण्याचा पक्षादेश सुनील प्रभू यांच्याकडून का काढण्यात आला, असा सवाल जेठमलानी यांनी विचारला. त्यावर सर्वच आमदारांना व्हीप बजावला होता. काही आमदार पक्ष विरोधी मतदान करणार होते, असे समजले. विश्वास दर्शक ठराव भारतीय जनता पक्षाने मांडला होता. या ठरावाला महा विकास आघाडीने विरोध दर्शवला होता. शिवसेना महाविकास आघाडी सोबत होती. म्हणून विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करावे, म्हणून हा व्हीप काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. (MLA Disqualification Case)

कोणाच्या सांगण्यावरून व्हीप वाजवला, असा प्रश्न विजय जोशी यांना जेठमलानी यांनी विचारला. जोशी यांनी प्रतोदांच्या सूचनेनुसार व्हीप काढल्याचे स्पष्ट केले. यावर व्हीप टाईप कोणी केला? असा प्रश्न जोशींना विचारला त्यावर ऑपरेटर अस उत्तर जोशी यांनी दिले. त्यावर ऑपरेटर कुठे होता? असा प्रश्न जेठमलानी यांनी जोशींना केला. जोशींनी जाग्यावर असे तर उत्तर दिले. त्यानंतर एकच हशा पिकला. (MLA Disqualification Case)

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी

ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली? काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीवर टीका केली नाही? असे प्रश्न विचारले असता त्यावर उत्तर देता येणार नाही, असे प्रभू यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी नाही तर युती केली, हे सत्य असल्याचे प्रभू म्हणाले. (MLA Disqualification Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.