MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर काय म्हणतात कायदेतज्ज्ञ आणि प्रमुख राजकीय नेते?

382

शिवसेना अपात्र आमदार (MLA Disqualification Case)  प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निर्णय दिला. त्यानंतर कायदेतज्ज्ञांनी याचे विश्लेषण सुरु केले, तसेच राजकीय पक्षांनीही त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उबाठा गटाच्या हातून सर्व काही संपले नाही, अजूनही त्यांना संधी आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेबद्दल (MLA Disqualification Case) 10 परिशिष्ट अध्यक्षांनी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचा व्हीप ग्राह्य धरला होता आणि भरत गोगावले यांचा ग्राह्य धरला नव्हता. अध्यक्षांनी निकालपत्रात सकृतदर्शनी दोन्ही व्हीप ग्राहय धरल्याचे दिसत आहे. दोन्ही व्हीप ग्राह्य धरण्याला आधार काय? हे संपूर्ण निकालपत्राच वाचन केल्यानंतरच समजेल. निश्चित ठाकरे गटाला याबाबतीत चांगला युक्तीवाद करता येऊ शकतो. व्हीपचा मुद्दा ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायलयाच्या घटनापीठाने निकालात प्रतोदपदाबद्दल महत्त्वाच निरीक्षण नोंदवल होते. अध्यक्षांनी त्या निर्णयाला हरताळ फासलाय का? हे तपासाव लागेल, असे उज्ज्वल निकम म्हणाले.

(हेही वाचा MLA Disqualification Case : घराणेशाही मोडीत निघाली; विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर जोरदार टीका केली. हा निकाल अपेक्षित होता. ठाकरेंच्या विरोधात निकाल लागणार माहित होते. गोगावलेंच्या प्रतोपदाला न्यायालयात मान्यता दिली नव्हती. हा निकाल अनपेक्षित होता, असे म्हणण्याचे काही कारण नाही. जे राजकीय विश्लेषक आहेत, राजकीय अभ्यासक आहेत, ते आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. त्यांना माहित होते, निकाल काय येणार?. हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही शंका नव्हती, असे आव्हाड म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राचा महानिकाल वाचून दाखवला. निकाल वाचत असताना संपूर्ण निकाल मी स्वतः लाईव्ह पाहिला. त्यावेळी मला काही प्रश्न पडले. महाराष्ट्राच्या महानिकालाच इंग्रजीत वाचन का? मला वाटले की सुरुवातीचे पाच मिनिटे इंग्रजीत असावीत. परंतु पूर्णच निकाल इंग्रजीत दिला. अध्यक्ष निकाल वाचताना अडखळत देखील होते. तेव्हा मला वाटते की निकाल स्वतः अध्यक्ष यांनी लिहिला होता की त्यांना कोणी ड्राफ्ट बनवून दिला होता. अध्यक्ष ज्या ठिकाणी अडखळत होते त्याबद्दल त्यांना जर आज जरी विचारले तरी त्यांना नीट उत्तर देता येणार नाहीत. निकालातील प्रश्नावर ते उत्तर देऊ शकणार नाही. निकालात त्यांचे शब्द नव्हते, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.

आमचे सरकार मजबूत आहे. हे मी पहिल्यापासून सांगत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना, हीच मूळ शिवसेना आहे. ज्यांना कायदा समजत नाही, ज्यांनी कायदा कधी पाळला नाही, ते काहीही बोलतात. काही लोकांनी विधानसभा अध्यक्षांवर आरोप केले, यात आश्चर्य वाटत नाही. तांत्रिक कारणामुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र होत नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांचा अवमान संजय राऊत, आदित्य ठाकरेंना भोवणार)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्रतेप्रकरणी दिलेला निकाल हा स्क्रिप्टेड होता. मुद्दाम वेळ वाढवून उशिराने निकाल दिला गेला. एकास पात्र आणि दुसऱ्यास अपात्र ठरवले असते तर जनतेचा उद्रेक झाला असता म्हणून दोन्ही गटास पात्र करण्यात आले आहे. मात्र हा अंतिम निकाल नाही. राज्यातील जनता योग्यवेळी त्यांना आपली जागा दाखवेल,  या शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.