शिंदे गटाच्या 13 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी (MLA Disqualification) सोमवार, 25 सप्टेंबर रोजी विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. ही सुनावणी 13 ऑक्टोबर पर्यंत स्थगित करण्यात आली. यावेळी शिंदे गटाच्या वतीने ऍड. साखरे यांनी उक्तीवाद केला, तर ठाकरे गटाचेचे वकील ऍड. देवदत्त कामत उपस्थित होते.
यावेळी देवदत्त कामत यांनी आमदारांच्या अपात्रतेसंबंधी (MLA Disqualification) दाखल सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. मात्र शिंदे गटाने याला विरोध करत सर्व याचिकांवर वेगवेगळी सुनावणी घेण्याची मागणी केली. आता याचिकांवर एकत्र सुनावणी करायची की वेगवेगळी सुनावणी करायची याबाबत 13 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आमदारांच्या अपात्रतेबाबत (MLA Disqualification) राहुल नार्वेकर यांनी गेल्या 14 सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली होती. ठाकरे गटाने आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आमदार अपात्रतेसंबंधी सोमवारी सुनावणी घेण्याचे ठरले.
Join Our WhatsApp Community