भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावात २० ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. त्यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. येनकेन प्रकारेण ही शर्यत होणार नाही, असे पोलिसांनी ठरवले आहे, तर आमदार पडळकर हे ही शर्यत होणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध पोलिस असा सामना सुरु झाला आहे.
शर्यतीविरोधात पोलिसांची रणनीती!
बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. त्यामुळे शर्यतीच्या आयोजनावर प्रतिबंध आणावा, असा आदेश गृहमंत्रालयाने स्थानिक पोलिस प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे १७ ऑगस्टपासूनच पोलिस प्रशासन तयारीला लागले आहे. सांगली पोलिस अधीक्षक यांनी थेट नोटीस काढली. त्यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर प्रतिबंध आणला आहे, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसारही या शर्यतीचे आयोजन करता येणार नाही. बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस देण्यात यावी. आयोजक तरीही शर्यतीसाठी आग्रही असतील, तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करावी. ज्या ज्या मार्गावरून बैल गाड्या येणार आहेत, त्याची पाहणी करून त्यावर प्रतिबंध आणावा १७ ऑगस्टपासूनच नाकाबंदी लागू करावी, असे या नोटिशीत म्हटले होते.
(हेही वाचा : बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, तालिबानी नव्हे! आमदार पडळकर कडाडले)
मैदान खोदले!
दरम्यान शर्यतीच्या आदल्या दिवशी पोलिसांनी ज्या मैदानात शर्यत होणार आहे, त्याठिकाणी येऊन जेसीबीच्या माध्यमातून मैदान खोदले. त्यावर आडवे चरे मारण्यात आले आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती मैदानात आता बैल गाड्या धावू शकणार नाही. विशेष म्हणजे या मैदानापासून काहीच अंतरावर आमदार पडळकर यांचे फार्म हाऊस आहे. बुधवारी, १९ ऑगस्टपासून पोलिसांनी झरे गावासह आजूबाजूच्या ९ गावांमध्ये संचारबंदी जाहीर केली आहे. त्याचा बरोबर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सांगली पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त लावला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर शर्यतीवर ठाम!
पोलिसांनी कितीही विरोध केला तरी बैल गाडा शर्यत होणारच, अशी ठाम भूमिका आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याने ही शर्यत होऊ नये म्हणून शर्यतीच्या ठिकाणी नाकाबंदी लावली आहे, संचारबंदी केली आहे. या शर्यतीसाठी भोळाभाबडा शेतकरी येणार आहे, अफगाणिस्तानातून तालिबानी येणार नाही, अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारचा निषेध केला.
Join Our WhatsApp Community