आमदार गोपीचंद पडळकरांच्या बैलगाडा शर्यती होणार की रद्द होणार?

बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस देण्यात यावी. आयोजक तरीही शर्यतीसाठी आग्रही असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करावी, असे सांगली पोलिस अधीक्षकांच्या नोटिशीत म्हटले आहे.

गोवंश रक्षणासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २० ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. मात्र ही शर्यत होऊच नये यासाठी आतापासूनच स्थानिक पोलिस प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे. त्यासाठी १७ ऑगस्टपासूनच पोलिसांनी या भागात नाकाबंदी लावली आहे. कोणाही शेतकऱ्याला बैलगाडा घेऊन येता येणार नाही, अशी व्यवस्था पोलिस प्रशासनाने केली आहे. मात्र दुसरीकडे आमदार पडळकर यांनी कितीही विरोध झाला, तरी गोवंश रक्षणासाठी बैलगाडी शर्यत होणारच, असा निर्णय घेतला आहे.

काय म्हटले आहे पोलिसांच्या नोटिशीत? 

  • सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही नोटीस काढली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर प्रतिबंध आणला आहे, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसारही या शर्यतीचे आयोजन करता येणार नाही.
  • बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस देण्यात यावी. आयोजक तरीही शर्यतीसाठी आग्रही असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करावी.
  • ज्या ज्या मार्गावरून बैल गाड्या येणार आहेत, त्याची पाहणी करून त्यावर प्रतिबंध आणावा १७ ऑगस्टपासूनच नाकाबंदी लागू करावी.

(हेही वाचा : गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी! आमदार पडळकरांचा गंभीर आरोप)

काय म्हटले आमदार पडळकर? 

गोवंश रक्षणासाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस छळ कपटाने बंदी आणत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शेतकरी नाराज होऊ नयेत म्हणून त्यांच्यासोबत बैठका घेऊन ‘आमचा शर्यतीला विरोध नाही’, असे सांगत आहेत. मात्र त्याच वेळी दुसरीकडे राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहमंत्रालयाने मात्र या शर्यतीवर बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २० ऑगस्टला शर्यत होणार आहे, मात्र १७ ऑगस्टपासूनच पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. शर्यतीसाठी कोणी तालिबानी येत नाही, तर शेतकरी येत आहेत. त्यामुळे गोवंशाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन शर्यतीत सहभागी व्हावे, असे आमदार पडळकर म्हणाले.

अशी होणार शर्यत!

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here