शिवसेनेचे आमदार ‘वादळ’ निर्माण करण्याच्या तयारीत!

भाजप सरकारच्या काळात मंत्री असलेले शिवसेनेचे नेते देखील सध्या प्रचंड नाराज असून, आमदार असलेल्या काही माजी मंत्र्यांनी तर शिवसेनेच्या बैठकांना देखील जाणे टाळले आहे. तर काही जण पक्षात असून नसल्यासारखे आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आता दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण आजही या तीन पक्षातील अंतर्गत धुसफूस काही कमी होताना दिसत नाही. आधीच निधी मिळत नसल्याने काँग्रेसचे आमदार नाराज असताना आता शिवसेना आमदारांमध्ये देखील खदखद वाढू लागली आहे. राज्यात कोरोनाच्या संकटामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच मतदारसंघामध्ये आमदारांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असताना आता कामे होत नसल्याने शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री शिवसेना आमदारांना भाव देत नसल्याची देखील भावना आता सेनेच्या ग्रामीण भागातील आमदारांची झाली आहे. एवढेच नाही तर सेनेचे मंत्री बिनकामाचे असल्याचे देखील काही आमदारांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी खासगीत बोलताना सांगितले. तर काही आमदारांनी तर मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला तरी रुबाब मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा असल्याची खंत बोलून दाखवली. एकूणच ही परिस्थिती बघता राज्यात तौक्ते वादळा नंतर शिवसेना आमदार आता ‘वादळ’ तयार करणार नाही ना, असा प्रश्न पडू लागला आहे.

शिवसेनेच्या आमदाराची थेट पवारांवर टीका!

शिवसेनेच्या आमदारांमधली खदखद इतकी वाढत चालली आहे की, सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी तर महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांच्यावरच टीका केली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे, हे देशभर सांगायचे ही पवारांची पद्धत आहे. शरद पवार राज्याचे नेते पण फक्त बारामतीचा विकास केला, असा आरोप आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्यास सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी तीव्र विरोध केला.

(हेही वाचा : मुंबईत आतापर्यंतच्या ‘मे’ महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस!)

शिवसेनेचे आजी-माजी मंत्रीही नाखूष!

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे सरकारमध्ये असलेला एक मंत्री देखील सध्या नाराज आहे. या मंत्र्याला मंत्रिपद दिले खरे पण त्याला त्याच्या मर्जीने काम करता येत नसल्याची चर्चा सध्या या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मध्यतरी हा मंत्री शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा रंगली होती. तर भाजप सरकारच्या काळात मंत्री असलेले शिवसेनेचे नेते देखील सध्या प्रचंड नाराज असून, आमदार असलेल्या काही माजी मंत्र्यांनी तर शिवसेनेच्या बैठकांना देखील जाणे टाळले आहे. तर काही जण पक्षात असून नसल्यासारखे आहेत. त्याचमुळे शिवसेनेचे आजी-माजी मंत्री राज्यात शिवसेनेचे सरकार असूनही नाखूष दिसत आहेत.

सध्या राज्यात इतके आहेत शिवसेनेचे आमदार!

राज्यात सध्या शिवसेनेचे 56 आमदार असून, यातील 20 ते 25 आमदार सध्या नाराज असून, यातील काही आमदारांशी खासगीत बोलले असता त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. माजी मंत्री असलेल्या दोन आमदारांनी तर जे सुरू आहे ते फक्त आम्ही गपगुमान बोलत असून, आम्ही सध्या पक्षात सुरू असलेल्या बऱ्याच गोष्टीकडे बघणे सोडून दिले आहे. तसेच इतकी वाईट अवस्था आमची याआधी कधी झाली नसल्याचे देखील हे आमदार खासगीत बोलताना सांगितले.

(हेही वाचा : आमदार सरनाईकांच्या रिसॉर्टवर ईडीचा छापा! )

शिवसेनेत हे नेते नाराज असल्याची चर्चा!

शिवसेनेमध्ये सध्या रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, तानाजी सावंत, नुकताच राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा सुरू असून, हे नेते सध्या फार सक्रिय देखील दिसत नाहीत. हे सर्व माजी मंत्री सध्या स्वतःच्या मतदारसंघात राहणेच पसंत करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here